Farmers in Marathwada need assistance of Rs 2904 crore relief fund for wet drought | मराठवाड्यात ओला दुष्काळ; शेतकऱ्यांना २,९०४ कोटी रुपयांच्या मदतीची गरज
मराठवाड्यात ओला दुष्काळ; शेतकऱ्यांना २,९०४ कोटी रुपयांच्या मदतीची गरज

ठळक मुद्दे बीड, औरंगाबाद, नांदेडमध्ये प्रत्येकी ४०० कोटींपेक्षा जास्त निधीची गरज लागणार आहे परतीच्या पावसाला जिरायती क्षेत्र सर्वाधिक बळी पडले.

औरंगाबाद : मराठवाड्यात आॅक्टोबरच्या उत्तरार्धात आणि नोव्हेंबरच्या पूर्वार्धात झालेल्या पावसामुळे ४४ लाख ३३ हजार ५४९ शेतकऱ्यांची जिरायत, बागायत आणि फळबागा मिळून ४१ लाख ४९ हजार १७५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती मदत निधी निकषानुसार दोन हजार ९०४ कोटी रुपयांची गरज लागणार आहे. विभागीय प्रशासनाने यासंदर्भातील अंतिम अहवाल तयार करून बुधवारी शासनाकडे पाठविला. अहवालात मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची जिल्हानिहाय माहिती देण्यात आली आहे. बीड, औरंगाबाद, नांदेडमध्ये प्रत्येकी ४०० कोटींपेक्षा जास्त निधीची गरज लागणार आहे, तर हिंगोली जिल्ह्यात १८८ कोटींच्या आसपास निधीची गरज लागणार आहे. शासन या अहवालाच्या तुलनेत किती अनुदान मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देण्यासाठी तरतूद करील, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. 

आॅक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाला जिरायती क्षेत्र सर्वाधिक बळी पडले. ४० लाख ४७ हजार २१० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना सर्वाधिक फटका बसला. ६९ हजार ४११ हेक्टरवरील बागायती क्षेत्रावरील नुकसान झाले, तर ३२ हजार ५५२ हेक्टरवरील फळबागा पावसाने झोपविल्या. बाधित क्षेत्राच्या आकड्यांवरून असे दिसते, मराठवाड्यातील खरीप हंगाम पूर्णत: पावसावरच अवलंबून आहे. समान टप्प्यात पाऊस झाला नाही, तर येथील शेतकऱ्यांचे नुकसान ठरलेलेच आहे. ओल्या किंवा कोरड्या दुष्काळाच्या झळांमुळे खरीप हंगाम हातून जाण्याचे संकट या दशकात अनेकदा आले. 

जिरायती क्षेत्राला प्रतिहेक्टर ६ हजार ८०० रुपये, बागायत क्षेत्राला १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर, तर फळबागांना १८ हजार रुपये प्रतिहेक्टर निधी अपेक्षित धरून विभागीय प्रशासनाने मराठवाड्यातील एकूण नुकसान आणि लागणाऱ्या निधीचे अनुमान लावले आहे. ५४ लाख ६८ हजार ३५८ हेक्टर पेरणीलायक क्षेत्र सरलेल्या खरीप हंगामात होते. त्यापैकी ५० लाख २० हजार ५९१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्यातील ४१ लाख ४९ हजार १७५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान पावसामुळे झाले.

जिल्हानिहाय मदत अशी लागेल 
जिल्हा        एकूण मदतीची गरज 
औरंगाबाद    ४२६ कोटी ३३ लाख 
जालना        ३९८ कोटी ८६ लाख 
परभणी        ३१२ कोटी ४४ लाख 
हिंगोली    १८८ कोटी १८ लाख 
नांदेड        ४३० कोटी ९९ लाख 
बीड        ५१४ कोटी ८० लाख 
लातूर        ३५६ कोटी २ लाख 
उस्मानाबाद    २७६ कोटी ७४ लाख
एकूण         २९०० कोटी ४४ लाख 

जिल्हानिहाय नुकसान आणि मदत अशी 
औरंगाबाद : जिल्ह्यातील ६ लाख ३८ हजार ३०४ शेतकरी बाधित झाले. ६ लाख ५ हजार ३३८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ४२६ कोटी ३३ लाख रुपयांची गरज शासनाच्या निकषानुसार लागेल, असे विभागीय प्रशासनाने अहवालात म्हटले आहे. 

जालना : जिल्ह्यातील ५ लाख ८२ हजार २६८ हेक्टवरील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या ५ लाख २६ हजार ३४१ हेक्टवरील खरीप हंगाम संपुष्टात आला. जिरायत, बागायत, फळबागांचा यात समावेश आहे. ३९८ कोटी ८६ लाखांचा निधी जिल्ह्याला लागेल. 

परभणी : जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या ४ लाख ५६ हजार ९३३ हेक्टवरील जिरायत, बागायत, फळबागांचे नुकसान पावसामुळे झाले. ३१२ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी आवश्यक आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील ३ लाख १,९६० शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या २ लाख ७६ हजार २५७ हेक्टरवरील जिरायत, बागायत, फळबागांचे नुकसान पावसाने केले. १८८ कोटी १८ लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला लागेल.

नांदेड : जिल्ह्यातील ७ लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांचे ६ लाख ३३ हजार ४६९ हेक्टरवरील जिरायत, बागायत, फळबागांच्या पिकांचे नुकसान झाले. ४३० कोटी ९९ लाख रुपयांचे अनुदान जिल्ह्याला लागेल.

बीड : जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७५९ शेतकऱ्यांनी ७ लाख ५६ हजार ९२७ हेक्टवर पेरणी केलेले जिरायत, बागायत, फळबागांचे पीक पावसामुळे वाया गेले. ५१४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान जिल्ह्याला लागणार आहे. 

लातूर : जिल्ह्यातील ४ लाख ८६ हजार ४ शेतकऱ्यांनी पेरणी केलेले ५ लाख १७ हजार ५७४  हेक्टवरील खरीप हंगाम पावसाने हिरावला. जिल्ह्याला ३५६ कोटी २ लाख रुपयांचे अनुदान लागेल. 

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ४ लाख १८ हजार ४४७ शेतकऱ्यांनी सरत्या खरीप हंगामात ३ लाख ७६ हजार ३३३ हेक्टरवर जिरायत, बागायत, फळबागांसाठी पेरणी केली होती. त्याचे पावसामुळे नुकसान झाले. जिल्ह्याला २७६ हजार कोटी ७४ लाख रुपयांची मदत लागणार आहे.

Web Title: Farmers in Marathwada need assistance of Rs 2904 crore relief fund for wet drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.