Emphasis on electronic analysis to track down criminals | गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी इलेक्ट्रॉनिक विश्लेषणावर भर

गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी इलेक्ट्रॉनिक विश्लेषणावर भर

ठळक मुद्देगुन्ह्यात जप्त झालेल्या मुद्देमालांचे रासायनिक विश्लेषण केले जाते. राज्यभरात १३ प्रयोगशाळा आहेत.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी पोलिसांच्या तपासात प्रादेशिक न्यायसाहाय्य वैज्ञानिक प्रयोगशाळा महत्त्वाची भूमिका निभावत आहे. गुन्ह्यात जप्त झालेल्या मुद्देमालांचे रासायनिक विश्लेषण केले जाते. गेल्या काही वर्षांत गुन्ह्यांचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रॉनिक विश्लेषणावरही भर द्यावा लागत आहे. त्यामुळे ३ वर्षांपूूर्वी ‘स्पीकर आयडेंटिफिकेशन व्हाईस अ‍ॅनॅलिसिस’ विभाग सुरू झाला. मुंबई, पुणे, नागपूरनंतर आता औरंगाबादेत लवकरच सायबर फॉरेन्सिक विभाग सुरू केला जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक न्यायसाहाय्य वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक रा.रा. मावळे यांनी दिली.

गृह विभागाच्या अंतर्गत असलेल्या या प्रयोगशाळेत विषशास्त्र, जीवशास्त्र, सामान्य विश्लेषण, दारूबंदी विभाग, रक्त मद्यार्क, स्पीकर आयडेंटिफिकेशन व्हाईस अ‍ॅनॅलिसिस, असे विविध विभाग आहेत. राज्यभरात १३ प्रयोगशाळा आहेत. यात औरंगाबादसह ८ प्रयोगशाळा मोठ्या आहेत, तर ५  मिनी प्रयोगशाळा आहेत. खून, अत्याचार, अशा विविध गुन्ह्यांमध्ये आरोपींचा शोध घेण्यापासून, तर त्यांना शिक्षा होण्यात प्रयोगशाळेचा अहवाल महत्त्वाचा ठरतो. लाचेच्या प्रकरणात पूर्वी नोटांवर रसायन लावले जात असे; परंतु त्यातून गुन्हा सिद्ध करण्यास अनेक अडचणी येत असत. त्यामुळे आता लाचेच्या मागणीच्या वेळी लाचेच्या मागणीचे रेकॉर्डिंग करण्यास प्राधान्य दिले जाते. झालेल्या संवादाचे रेकॉर्डिंग आणि नंतर तोच संवाद पुन्हा करण्यास सांगितला जातो. त्यातून दोन्ही आवाज एकच आहे की नाही, याचा  ‘स्पीकर आयडेंटिफिकेशन व्हाईस अ‍ॅनॅलिसिस’ विभागात छडा लावला जातो. खंडणी, धमकीच्या प्रकरणातही हा विभाग महत्त्वाची कामगिरी करीत आहे. महिनाभरात अशा १५ ते २० प्रकरणांचा तपास होतो.मुंबई, पुणे, नागपूर येथेच सध्या सायबर फॉरेन्सिक विभाग कार्यान्वित आहे. आपल्या येथेही लवकरच हा विभाग सुरू केला जाणार आहे, असे रा.रा. मावळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

मूळ आवाज शोधणे शक्य
एकदा केलेला संवाद एखाद्या व्यक्तीने दुसऱ्यांदा आवाज बदलून केला, तरी दोन्ही आवाज एकाच व्याक्तीचे आहेत अथवा नाही, हे शोधणे शक्य आहे. आवाज बदलून धमकी, खंडणी देण्याचा प्रकार होतो. अशा वेळी रेकॉर्ड झालेला आवाज मूळ कोणाचा आहे, हे शोधणे शक्य आहे. केवळ त्यासाठी संबंधित व्यक्तीचा आवाज उपलब्ध असणे गरजेचे आहे. 

कसाबच्या वयाचा लावला छडा
मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात अजमल कसाब हा एकमेव जिवंत दहशतवादी पोलिसांच्या हाती लागला होता. कसाब ज्या जहाजातून (नाव) दाखल झाला होता, त्यात पोलिसांना त्याचे जॅकीट सापडले होते. कसाबने स्वत:चे वय १६ वर्षे असल्याचा आणि भारतीय असल्याचा दावा केला होता; परंतु जॅकीटवरील घाम, पाकिस्तानातील त्याच्या आई-वडिलांच्या रक्ताच्या नमुन्यावरून त्याचे वय २० वर्षे असल्याचा, तो भारतीय रहिवासी नसल्याचा अहवाल मुंबईच्या प्रयोगशाळेने दिला होता. यासाठी ११ अधिकाऱ्यांनी काम केले होते. त्यात रा.रा. मावळे यांचाही समावेश होता. 

Web Title: Emphasis on electronic analysis to track down criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.