Delightful! The largest Sukhna dam in Aurangabad taluka filled to full capacity | आनंददायक ! औरंगाबाद तालुक्यातील सर्वात मोठे सुखना धरण पूर्ण क्षमतेने भरले

आनंददायक ! औरंगाबाद तालुक्यातील सर्वात मोठे सुखना धरण पूर्ण क्षमतेने भरले

ठळक मुद्दे2006 नंतर पहिल्यांदाच हे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे.

- श्रीकांत पोफळे
करमाड  : औरंगाबाद तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प म्हणून ओळख असलेले गारखेडा (ता.औरंगाबाद) येथील सुखना धरण ३१ जुलै रोजी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने पूर्ण क्षमतेने भरले. 2006 नंतर पहिल्यांदाच हे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. मागील वर्षी याच दिवशी हे धरण पूर्ण कोरडे होते. जुलै महिन्यात धरण भरण्याची ही पहिलीच वेळ असल्याची तालुक्यात चर्चा आहे.

औरंगाबाद तालुक्यात बनगाव येथील लहुकी , लाडसावंगी येथील बाबुवाडी , दौलताबाद येथील मोमबत्ता तलाव आदी धरणे आहेत. दरम्यान, यात सुखना धरण सर्वात मोठे आहे. यावर्षी सगळीकडेच पावसाळ्याच्या सुरूवातीपासुनच चांगले पर्जन्यमान राहिले आहे. सुखना नदीच्या उगमावरही सुरूवातीपासुन चांगला पाऊस होत असल्याने कोरड्याठाक पडलेल्या या सुखना धरणात दोन महिन्यांतच शंभर टक्के पाणीसाठा झाला. 

मागील वर्षी पुर्ण पावसाळ्यात या धरणात फक्त 15% पाणीसाठा उपलब्ध होता. तत्पूर्वी तर ते कोरडे होते व त्यानंतर उन्हाळ्यापुर्वीच ते पुन्हा कोरडे पडले होते. दरम्यान, आता ते पूर्ण क्षमतेने भरल्याने पंचक्रोशीसह लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण आहे. सांडव्यातुन पाणी वाहतानाचे व धरणातील पाणीसाठ्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी गारखेडा येथे रोजच बघ्यांची मोठी प्रमाणात गर्दी होत आहे.

या भागातील पिंप्रीराजा व  आडगाव खुर्द हा परिसर 25 वर्षापुर्वी याच धरणाच्या भरोशावर मोसंबीचे माहेर घर बनला होता. या धरण व आसपासच्या परिसरात सुमारे तीन हजार शेतकर्‍यांनी आपल्या विहीर खोदून येथून कमीत-कमी तीन ते पंधरा किलोमीटर अंतरावर पाईपलाईन नेल्या आहेत. याशिवाय 15 ते 20 गावालाही येथून पाणीपुरवठा होतो. यावर खासगी शेतकर्‍यांचे व शासकीय योजना मिळुन कोट्यावधी रूपये खर्च झालेले आहेत. तथापि, मागील कित्येक वर्षांपासुन हे धरण नेहमीच कोरड्या अवस्थेत राहत असल्याने पुर्वीचे बागायतदार आता कोरडवाहू शेतकरी बनले आहेत. शिवाय शेती तोट्यात गेली ती वेगळीच. उभारणीपासुन विभागाकडे असलेल्या सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत हे धरण फक्त सहा वेळाच पूर्ण क्षमतेने भरले आहे.


धरण पाळूला बाभूळ व इतर काटेरी झाडांचा धोका

पाटबंधारे विभागाकडुन दरवर्षी दुरूस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी होत असते. वास्तविक पाहता किरकोळ डागडुजी व कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्यापुरत्याच झाडांची कत्तल होत असते. आजस्थितीत मुख्य पाळुवर मोठ-मोठया सुबाभूळ, इतर काटेरी झाडी मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे भविष्यात धरणाला तडे जाऊन मोठा धोका निर्माण होऊ शकतो असा गारखेडा ग्रामस्थांचा आरोप आहे. मात्र, संबंधित यंत्रणेच्या पाहणीतुन धरण पुर्णपणे सुरक्षित असुन थोडया फार प्रमाणात काटेरी झुडपे आहेत व ती ही लवकरच काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 


दोनच महिन्यात धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने आता डाळींब मोसंबीच्या बागांसाठी उन्हाळ्यात पाणी विकत घ्यावे लागणार नाही. शिवाय परिसरातील पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध होईल याचे समाधान आहे. मात्र, पाटबंधारे विभागाने अनावश्यक झाडांची त्वरीत कत्तल करावी.
 - काकासाहेब चौधरी, शेतकरी गारखेडा.

धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या सात वर्षापुर्वी विहीर खोदत पाईपलाईन आणत लाखो रूपये खर्च केले. परंतु, एकदाही धरण 30 टक्क्याच्यावर न भरल्याने खर्च करून देखील फारसा उपयोग होत नव्हता. आता धरण भरल्याने त्याचा निश्चित फायदा होणार आहे.
 - दीपक पोफळे , शेतकरी हिवरा.


◆धरणाविषयी माहिती
● स्थापना  :  1965
● साठवण क्षमता :  21.35 दशलक्ष
● घनमीटर जिवंत साठा : 18.52 दलघमी
● मृतसाठा : 2.85 दलघमी

Web Title: Delightful! The largest Sukhna dam in Aurangabad taluka filled to full capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.