Children, pregnant mothers dengue fever; In 8 days, the number of dengue patients rises to 26 | मुले, गरोदर मातांना डेंग्यूचा विळखा; ८ दिवसांत रुग्णांची संख्या २६ वर
मुले, गरोदर मातांना डेंग्यूचा विळखा; ८ दिवसांत रुग्णांची संख्या २६ वर

ठळक मुद्दे३१ संशयित रुग्ण घाटीत दाखलजिल्ह्यात ५ महिन्यांत ४१५ रुग्ण 

औरंगाबाद : जुलै ते नोव्हेंबर अशा ५ महिन्यांच्या उद्रेकानंतर डिसेंबरमध्येही डेंग्यूची जीवघेणी वाटचाल सुरूच आहे. सर्वसामान्य व्यक्तींबरोबर लहान मुले आणि गरोदर माताही डेंग्यूचा विळख्यात सापडत आहेत. गेल्या ८ दिवसांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २६ वर गेली असून, घाटीत डेंग्यू झालेल्या ९ बालक, ९ प्रौढ आणि एका बाळंतिणीवर उपचार सुरू आहेत. 

डेंग्यूमुळे २ महिलांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब शनिवारी समोर आली.  घाटी रुग्णालयात वॉर्ड क्रमांक २७ मध्ये एका महिलेची सिझेरियन प्रसूती झाली. या महिलेचा डेंग्यूचा अहवाल पॉझिटिव्ह असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. लहान मुलांच्या वॉर्डामध्ये तब्बल ९ बालकांवर डेंग्यूचे उपचार सुरू आहेत. मेडिसिन विभागातील वॉर्डांमध्येही डेंग्यूचे ९ रुग्ण दाखल आहेत, तर तब्बल ३१ डेंग्यू संशयित रुग्णांवरही उपचार सुरू आहेत. या रुग्णांचा अहवाल येण्याची प्रतीक्षा  डॉक्टरांना आहे. लहान मुले आणि गरोदर मातांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे डेंग्यूचा लहान मुले आणि गरोदर मातांना, पर्यायाने होणाऱ्या नवजात शिशूलाही धोका निर्माण होतो.  त्यामुळे वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असते, असे तज्ज्ञांनी सांगितले. घाटीत उपचार घेणारे बहुतांश रुग्ण हे शहरातील असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

शहरात ८ दिवसांत २६ रुग्ण
डिसेंबर महिन्याच्या ८ दिवसांत जिल्ह्यातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ३२ वर गेली आहे. यामध्ये एकट्या औरंगाबादेतील रुग्णसंख्या २६ आहे; परंतु हे रुग्ण नोव्हेंबरमधील असून, त्याचा अहवाल आता पॉझिटिव्ह आल्याचा दावा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. महापालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून डेंग्यू नियंत्रणासाठी मोहीम राबविण्यात आली. जनजागृती करण्यात आली. मात्र, डेंग्यूचा विळखा अद्यापही सैल झालेला नाही. डेंग्यू आटोक्यात आल्याचा दावा फोल ठरत आहे.

अधिकारी, डॉक्टर म्हणाले...
नोव्हेंबरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचा डेंग्यूचा अहवाल डिसेंबरमध्ये पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्यासारखे दिसते. मात्र, सध्या रुग्णसंख्या कमी होत आहे, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ म्हणाले. घाटीतील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले, गेल्या काही दिवसांत डेंग्यूची लागण झालेल्या गरोदर माताही रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. यासंदर्भात अधिक माहिती घेतली जाईल.

जिल्ह्यात ५ महिन्यांत ४१५ रुग्ण 
औरंगाबाद जिल्ह्यात जुलै ते नोव्हेंबर या ५ महिन्यांच्या कालावधीत डेंग्यूचे तब्बल ४१५ रुग्ण आढळले. यामध्ये एकट्या औरंगाबाद शहरात ३१२ रुग्ण आढळले, तर ग्रामीण भागात १०३ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली. या ५ महिन्यांत दुर्दैवाने ११ जणांचा डेंग्यूने बळी घेतला. चिश्तिया कॉलनी येथील बाळंतिणीच्या मृत्यूमुळे शहरात डेंग्यूने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या १२ वर गेली आहे, तर जिल्ह्यात मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

Web Title: Children, pregnant mothers dengue fever; In 8 days, the number of dengue patients rises to 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.