Chatting with a foreign school alumni | एकशिक्षकी शाळेच्या परदेशी शाळांसोबत गप्पागोष्टी

एकशिक्षकी शाळेच्या परदेशी शाळांसोबत गप्पागोष्टी

ठळक मुद्देऑक्टोबरमध्ये शाळेला सुरुवात१२ वरून ३२ विद्यार्थ्यांपर्यंत मजल

- राम शिनगारे 

औरंगाबाद : बजाजगेट परिसरातील जि. प. शाळेत आठ महिन्यांपूर्वी गुरे बांधली जात होती. खोल्यांना झाडाझुडपांनी वेढा घातलेला होता. घाणीचे साम्राज्य होते. दहा वर्षांपूर्वी बंद पडलेली ही शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. तेव्हा याच परिसरात १२ मुले शाळाबाह्य आढळली होती. त्यामुळे जि. प. प्रशासनाने ही शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. 

२१ ऑगस्ट २०१९ रोजी १२ विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या शाळेत शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वीच ३२ विद्यार्थी दाखल झाले असून, या शाळेतील विद्यार्थ्यांचा संवाद अमेरिका, मालदीवच्या विद्यार्थ्यांशी होत आहे. औरंगाबाद शहरापासून जवळच असलेल्या वळदगाव हद्दीमध्ये बजाजगेटसमोर काही वर्षांपूर्वी तीन खोल्यांची शाळा सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून बांधण्यात आली होती. ही शाळा कालांतराने बंद पडली. ती दहा वर्षांपासून बंद होती. बजाजगेट परिसरात राहणाऱ्या कामगारांनी ही शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांच्याकडे केली. त्यांनीही सकारात्मकता दाखवत तत्कालीन सीईओ पवनीत कौर यांच्याकडे हा विषय मांडला. 

या परिसरात १२ शाळाबाह्य मुले असल्याचेही सीईओंच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे त्यांनी शाळा पुन्हा सुरू करण्यास मंजुरी दिली. २१ ऑगस्ट २०१९ रोजी पहिली ते पाचवी ही सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा पुन्हा सुरू झाली. या शाळेत विजय लिंबोरे आणि नितीन अंतरकर या शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. ही शाळा सुरू करतानाच शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी आंतरराष्ट्रीय शाळा बनविण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मात्र, काही दिवसांत तांत्रिक अडचणीमुळे नितीन अंतरकर यांना त्यांच्या मूळ शाळेत रुजू व्हावे लागले. तेव्हापासून विजय लिंबोरे हे एकमेव शिक्षक राहिले. या शिक्षकाने परिसरातील नागरिकांच्या मदतीने अवघ्या ८ महिन्यांत शाळेचा कायापालट केला. शासनाकडून एक रुपयाचीही मदत न घेता शाळा अत्याधुनिक केली. हे पाहून परिसरातील नागरिकांनी स्वत:ची मुले इंग्रजी शाळेतून काढून जि. प.च्या शाळेत टाकली. त्यामुळे शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी विद्यार्थ्यांची संख्या १२ वरून ३२ वर पोहोचली आहे. ३२ विद्यार्थी हे इयत्ता दुसरी ते चौथीच्या वर्गातील आहेत.

आगामी शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीतील प्रवेशाला १ फेब्रुवारीपासून सुरुवात केली असून, आतापर्यंत १० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याची माहिती मुख्याध्यापक विजय लिंबोरे यांनी दिली.पाचवीच्या वर्गात एकही विद्यार्थी नाही. चौथीत असणारे विद्यार्थी पाचवीत प्रवेश घेतील. आता दोन वर्गखोल्या असून, सीएसआर फंडातून जूनपर्यंत तीन खोल्या बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रत्येक वर्गात ३० प्रमाणे १५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचेही लिंबोरे यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाची रेलचेल : विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यासक्रम चार महिन्यांतच पूर्ण झाला. त्यामुळे काही विद्यार्थी पुढील वर्गातील अभ्यासक्रम शिकतात. तर काही विद्यार्थी यू-ट्यूब, गुगल बोलो, हॅलो इंग्लिश अ‍ॅप, गुगल ट्रान्सलेट आदी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक माहिती घेत आहेत. विद्यार्थ्यांना ग्लोबल वार्मिंग, पाणी समस्या, काम करण्यासह भारतीय संस्कृतीतील सण, उत्सवही साजरे करतात. 

अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी संवाद : या. शाळेतील दुसरी ते चौथीतील १६ विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील व्हिलिंग शहरातील युजीन फिल्ड एलिमेट्री स्कूलमधील विद्यार्थ्यांशी ‘फूड विथ फ्रेंडस्’ या विषयावर भारतीय वेळेनुसार शुक्रवारी (दि.१४) रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत ‘इम्पाटिको’ तंत्रज्ञानावरून संवाद साधला. (अमेरिकेतील वेळ सकाळी ९.३० ते १०.३०) मालदीवसह इतर देशांतील शाळांच्या विद्यार्थ्यांशी ‘इम्पाटिको’सह झूम अ‍ॅप, स्काईपवरून काही वेळ संवाद साधला असल्याचेही मुख्याध्यापक विजय लिंबोरे यांनी सांगितले.

Web Title: Chatting with a foreign school alumni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.