bus driver arrested who crushed women on Jalana road | केबलमध्ये अडकून खाली पडलेल्या महिलेला चिरडणारा बसचालक अटकेत

केबलमध्ये अडकून खाली पडलेल्या महिलेला चिरडणारा बसचालक अटकेत

ठळक मुद्देबस सीसीटीव्हीत कैद सिडको एन ८ मधून घेतले ताब्यात

औरंगाबाद : जालना रोडवर केबलमध्ये अडकून खाली पडलेल्या मोपेडस्वार महिलेच्या डोक्याचा चेंदामेंदा करून पसार झालेल्या बसचालकाला मंगळवारी (दि.२१) दुपारी मुुुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. 

भारत वसंतराव निनगुरकर (६४, रा. शिवदत्त हौसिंग सोसायटी, एन-८ सिडको), असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. दुचाकीस्वार ललिता शंकर ढगे (३९, रा. कासलीवाल पूर्व, चिकलठाणा) या केबलमध्ये अडकून शनिवारी (दि.१८) सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास जालना रोडवर पडल्या. पाठीमागून आलेली ट्रव्हल्स बस (एमएच १४ सी. डब्ल्यू. ३४७०) वेगाने त्यांच्या डोक्यावरून गेली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी महिलेला सोडून बसचालक सुसाट निघून गेला होता. अपघाताचा गुन्हा शनिवारीच मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मात्र, बस आणि चालक पोलिसांना सापडलेला नव्हता. 

कामगारांची ने-आण करणारी बस
औद्योगिक क्षेत्रात एका दारूच्या कारखान्यात कामगारांची ने-आण करणारी (कालिका ट्रॅव्हल्सची) बस ही भारत निनगुरकरच्या मालकीची आहे. शनिवारी अपघातानंतर तीन दिवस तो जालना रोडवर आलाच नाही. पोलिसांनी काढलेल्या माहितीवरून सिडको एन-८ येथून मंगळवारी त्याला अटक केली. गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण, विकास ढोकरे व कैलास काकड, प्रकाश सोनवणे, विजय चौधरी, संतोष भानुसे, गिते, दिगंबर चव्हाण आदींनी शोध मोहीम राबवून आरोपी व बसला ताब्यात घेतले. 

चार दिवस फिरकला नाही
औद्योगिक क्षेत्रात कामगार घेऊन जाणाऱ्या चार बस भारत निनगुरकरच्या मालकीच्या असून, शनिवारी कारखान्यातील शेवटचा कर्मचारी धूत कॉर्नरला सोडून यू टर्न घेऊन बस मुकुंदवाडीकडे निघाली होती. त्याचदरम्यान जालना रोडवर एक महिला दुचाकीवरून पडली आणि बसच्या मागील चाकाखाली आली. अपघाताने घाबरलेला चालक बससह पसार झाला. शनिवारपासून गेले चार दिवस बसचालक भारत निनगुरकर जालना रोडला फिरकलादेखील नाही; परंतु सीसीटीव्हीचे फुटेज बारकाईने तपासत असताना त्यात भारत निनगुरकरची गाडीही दिसून आली. त्यावरून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले, तेव्हा त्याने आपल्या वाहनाने अपघात झाल्याच नसल्याचा पवित्रा घेतला; परंतु दोन बसमधील अंतर आणि ही बस एका शोरूम व दवाखान्याच्या फुटेजमध्ये कैद झाली होती. अत्यंत बारकाईने पोलीस या आरोपीचा शोध घेत होते. घटनास्थळाचे काही पुरावे त्यास दाखवून पोलिसांनी आरोपीला अधिक विश्वासात घेतले. त्यावेळी शनिवारी सकाळी आपल्या बसने अपघात झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. 

अपघाताची माहिती न देताच पसार
अपघाताची गंभीर घटना होऊनदेखील माहिती दडवून गाडी घेऊन तो पसार झाला. अखेर चार दिवसांनंतर बसचालकाला पकडण्यात मुकुंदवाडी पोलिसांना यश आले. अपघातानंतर ठाण्यात माहिती न देता फरार राहून औद्योगिक क्षेत्रात कामगारांची ने-आण करण्याचे काम सुरू होते. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून आरोपीपर्यंत पोहोचता आले. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस निरीक्षक उद्धव जाधव यांनी सांगितले. महिला केबलमध्ये अडकून खाली पडली होती, बस चालकाने बस थांबविली असती तर महिलेचा जीव वाचला असता, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. 

सीसीटीव्हीमुळे सापडला चालक
काही प्रथमदर्शी आणि सीसीटीव्हीचे फुटेज शोधण्यासाठी पोलिसांचे पथक कामाला लागले. घटना हृदयद्रावक असल्याने प्रत्यक्षदर्शींचे लक्ष जखमी महिलेला मदत करण्याकडेच केंद्रित होते. गर्दी जमल्याचे पाहून बससह चालक तेथून पसार झाला होता. विविध ठिकाणचे फुटेज पाहून अपघाताच्या वेळेत जाणाऱ्या बसच्या चालकांना पोलीस निरीक्षक उद्धव जाधव यांनी बोलावून घेतले. त्यांची माहिती जाणून घेतली, तेव्हा तीन बस संशयित वाटल्या होत्या. त्या बसच्या व्यवस्थापकांना संपर्क साधून आरोपीला आणून सोडण्याची सूचना पोलिसांतर्फे करण्यात आली. सोबतच पसार झालेल्या चालकाचा पोलीस कसून शोध घेत होते. अखेर सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या बसची अधिक चौकशी केली असता सिडको एन-८ येथील भरत निनगुरकर याला अटक करण्यात यश आली. 

Web Title: bus driver arrested who crushed women on Jalana road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.