Bullet taken with fake loan approval letter; Filed charges against the finance company and both | बनावट कर्ज मंजुरी पत्र देऊन घेतली बुलेट; फायनान्स कंपनीचा अधिकारी आणि दोघांविरोधात गुन्हा दाखल

बनावट कर्ज मंजुरी पत्र देऊन घेतली बुलेट; फायनान्स कंपनीचा अधिकारी आणि दोघांविरोधात गुन्हा दाखल

ठळक मुद्देफायनान्स कंपनीने मात्र तक्रारदार यांना कर्ज मंजुरी पत्राप्रमाणे रक्कम दिली नाही.

औरंगाबाद : बुलेट मोटारसायकल खरेदीसाठी संबंधित ग्राहकांना कर्ज मंजूर केल्याचे बनावट पत्र दुचाकी वितरक असलेल्या चेरी कॉर्पोरेशनला देत  चोलामंडल इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचा चुना  लावल्याचे समोर आले. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात दोन ग्राहक आणि फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्राहक सूरज सुनील साळवे (रा. मिलकॉर्नर), शफिक पठाण रशीब पठाण (रा.  अमरावती, ता. फुलंब्री) आणि फायनान्स कंपनीचा सेल्स मॅनेजर किशोर नायक, ब्रँच मॅनेजर शिवराज मोरे, झोनल मॅनेजर शीतल जैन, क्लस्टर मॅनेजर प्रणव नायक आणि  प्रतिनिधी विजय वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तक्रारदार अनिता मनीष दंडगव्हाळ यांचे कॅनॉटमध्ये मोटारसायकल विक्रीचे चेरी कॉर्पोरेशन नावाचे दालन आहे. 

आरोपी वाघमारे हा फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी  तेथे काम करतो.  गणेश डोके हा काही  महिन्यांपूर्वी सूरज साळवे नावाने मोटारसायकल खरेदीसाठी आला.  वाघमारेने साळवे याला मोटारसायकल खरेदी करण्यासाठी त्याच्या फायनान्स कंपनीकडून १ लाख ३३ हजार २१ रुपये कर्ज मंजूर  केले. यानंतर तक्रारदार यांनी साळवेकडून २० हजार रुपये घेऊन आरटीओकडून त्याच्या गाडीची नोंदणी करून दिली. गाडी घेऊन तो निघून गेला. फायनान्स कंपनीने मात्र तक्रारदार यांना कर्ज मंजुरी पत्राप्रमाणे रक्कम दिली नाही. अशाच प्रकारे शफिक पठाण यांनाही दुचाकी खरेदी करण्यासाठी फायनान्स कंपनीने ८०  हजार रुपये कर्ज मंजूर केले. हे पत्र तक्रारदार यांच्याकडे जमा करताना वाघमारेने त्यावर खाडाखोड केली. 

कर्जाची आरटीओकडे नोंद 
आरोपीने सूरज साळवे आणि शफिक पठाण यांच्या मोटारसायकलची आरटीओकडे नोंदणी करताना फायनान्स कंपनीचे कर्ज असल्याचे नमूद आहे; परंतु ही रक्कम त्या कंपनीने दुचाकी वितरक यांना दिली नाही. केवळ आरटीओकडे नोंदणी करण्याचा खर्च देऊन ते दुचाकी वापरत आहेत.

Web Title: Bullet taken with fake loan approval letter; Filed charges against the finance company and both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.