Aurangabad rename : Stickers of 'Chhatrapati Sambhajinagar' on ST bus from Ahmednagar | नामकरणाचा वाद : अहमदनगरहून आलेल्या एसटी बसवर ‌‘छत्रपती संभाजीनगर’चे स्टिकर

नामकरणाचा वाद : अहमदनगरहून आलेल्या एसटी बसवर ‌‘छत्रपती संभाजीनगर’चे स्टिकर

ठळक मुद्देस्टिकर लावण्यावरून आणि काढण्यावरून वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

औरंगाबाद : शहराच्या नामकरणावरून महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू असताना मध्यवर्ती बसस्थानकात अहमदनगरहून आलेल्या तीन एसटी बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’चे स्टिकर लावण्यात आल्याचे गुरुवारी रात्री समोर आले. त्यामुळे नामकरणाचे लोण आता ‘एसटी’पर्यंत पोहोचले आहे.

मध्यवर्ती बसस्थानकात एक साधी बस आणि दोन निमआराम बसच्या (एमएस) समोरील भागावर ‘छत्रपती संभाजीनगर’चे स्टिकर लावल्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास पडले. त्यांनी याविषयी तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली. हे स्टिकर कुठे आणि कोणी लावले, याविषयी माहिती समजू शकली नाही; परंतु याविषयी नेमकी काय भूमिका घ्यायची, या संभ्रमात अधिकारी, कर्मचारी पडले होते. या तिन्ही बस मध्यवर्ती बसस्थानकातून रवाना झाल्या. त्यानंतरही मध्यवर्ती बसस्थानकात याविषयी एकच चर्चा सुरू झाली.

स्टिकर लावण्यावरून आणि काढण्यावरून वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासंदर्भात प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांतून होत आहे. नामकरणावरून सुरू असलेल्या राजकारणामुळे औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील नामफलकालाही रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांकडून संरक्षण दिले जात आहे. त्यात एसटी महामंडळाच्या बसगाड्यांवर फलक झळकले.

 

Web Title: Aurangabad rename : Stickers of 'Chhatrapati Sambhajinagar' on ST bus from Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.