क्षुल्लक कारणावरून तरूणावर चाकूने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:44 PM2019-11-11T17:44:39+5:302019-11-11T17:45:55+5:30

सिडको ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे

Attempts to kill a young man with a knife for minor reasons | क्षुल्लक कारणावरून तरूणावर चाकूने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न

क्षुल्लक कारणावरून तरूणावर चाकूने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न

googlenewsNext

औरंगाबाद: गल्लीत राहण्यासाठी का आला, असे विचारत तीन जणांनी एका तरूणावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी रात्री पावणेसात वाजेच्या सुमारास घडली. जखमी तरूणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याविषयी सिडको ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.  

शहारुख गफार शहा, फारूख गफार शहा आणि गफार शहा(रा. गल्ली नंबर ७, मिसारवाडी)अशी आरोपींची नावे आहेत. तर   शेख परवेज शेख लाल पटेल (रा. मिसारवाडी) असे जखमीचे नाव आहे. याविषयी सिडको पोलिसांनी सांगितले की, त्याचे वडिल आणि भाऊ हे गल्ली नंबर पाच मध्ये राहतात.  आरोपी आणि परवेजच्या कुटुंबामध्ये  जूना वाद आहे. या कुटुंबाच्या सिडको पोलीस ठाण्यात परस्परविरोधात तक्रारी आल्या होत्या. दरम्यान   शेख परवेज हा नुकताच मिसारवाडी येथील गल्ली नंबर ७ मध्ये राहण्यास गेला होता.   परवेजचे  त्यांच्या गल्लीत राहण्यास येणे आरोपींना आवडले नव्हते. १० रोजी रात्री पावणेसात वाजेच्या सुमारास परवेज त्याच्या घराजवळ उभा असताना आरोपीनी अचानक त्यास गाठले आणि तू आमच्या गल्लीत राहण्यास का आला, असे विचारत भांडण सुरू केले. परवेज त्यांना समजावून सांगत असताना आरोपीं शहारूखने धारदार चाकूने परवेजवर हल्ला चढविला. यावेळी त्याने परवेजच्या डाव्या आणि उजव्या बरगडीत, पाठीवर दोन्ही बाजूने आणि  डोक्याच्या डाव्या बाजुस, कपाळापासून ते कानाच्या वरपर्यंत चाकूने वार करून गंभीर जखमी केले. 

या घटनेत गंभीर जखमी होवून परवेज खाली कोसळताच आरोपी त्यास धमकावून पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेत  परवेजने वडिलांना फोन करून या घटनेची माहिती दिली. यानंतर त्याचे वडिल आणि भाऊ यांनी गंभीर जखमी परवेजला रुग्णायलात दाखल केले. याविषयी परवेजचे वडिल शेख लाल शेख चाँद पटेल यांनी  सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.  या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक आर. आर.डोईफोडे हे तपास करीत आहेत. 

Web Title: Attempts to kill a young man with a knife for minor reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.