'युती केली तरच टिकाल अन्यथा जेलमध्ये जाल...'; प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 07:37 AM2024-01-21T07:37:50+5:302024-01-21T07:38:12+5:30

वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभेला विराट गर्दी

'You can survive only if you make an alliance, otherwise you will go to jail...'; Prakash Ambedkar expressed his position | 'युती केली तरच टिकाल अन्यथा जेलमध्ये जाल...'; प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली भूमिका

'युती केली तरच टिकाल अन्यथा जेलमध्ये जाल...'; प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली भूमिका

अमरावती : काँग्रेससह इतर सर्वच महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मानगुटीवर कारवाईची तलवार लटकून आहे. त्यामुळे जर भीत-भीत निवडणुकीला सामोरे जाल तर सर्वांच्याच मानगुटीवर तलवार कोसळेल आणि सोनिया गांधींपासून सर्वच जेलमध्ये जातील. ‘वंचित’चा एकही नेता जेलमध्ये जाणार नाही. त्यामुळे युतीमध्ये लढाल तरच टिकाल अन्यथा सर्वच जेलमध्ये जाल, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी जाहीर सभेमध्ये व्यक्त केली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील सायन्सस्कोर मैदानावर लोकशाही गौरव महासभा  पार पडली. या जाहीर सभेतून एक प्रकारचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी प्रकाश आंबेडकरांचे विचार ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते व पदाधिकारी एकवटले होते. 

४८ जागा लढवण्याचीही तयारी 

प्रकाश आंबेडकर म्हणाले, दोन वर्षांपासून महाविकास आघाडीत लोकसभेच्या ४८ जागा वाटपासंदर्भातील समझोता झालेला नाही. त्यामुळे खरच यांना भाजपला हरवायचे आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. ते म्हणतात वंचितला आम्ही दोन जागा देतो, त्यामुळे त्या जागा कोणत्या यासंदर्भात जेव्हा काँग्रेसवाल्यांना विचारणा केली तर म्हणतात, अजून आमचं ठरल नसल्याचे सांगतात. त्यामुळे जर भाजपला हरवायचा असेल तर युतीमध्ये तुम्हाला लढावच लागेल. 

वंचितला सोबत घेतलं तर ठीक नाहीतर आम्ही सर्व ४८ जागाही लढवण्याचीही तयारी आहे. भाजपचा एक कलमी कार्यक्रम सुरू असून त्यांना फक्त देशात एकच पक्ष ठेवायचा आहे. लोकसभेच्या निवडणुका आटोपताच सत्ता भोगणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागेल, असा इशाराही यावेळी आंबेडकरांनी इंडिया आघाडीतील नेत्यांना दिला.

Web Title: 'You can survive only if you make an alliance, otherwise you will go to jail...'; Prakash Ambedkar expressed his position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.