सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 14:29 IST2025-09-10T13:42:39+5:302025-09-10T14:29:17+5:30

ऑगस्टमध्ये शेतकरी आत्महत्यांची शंभरी पार ! : यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांत अस्मानी, सुलतानी संकटाचे सर्वाधिक बळी

Yavatmal-Amravati again at the epicenter of suicides; Explosion of farmer suicides in 14 districts in the state | सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना

Yavatmal-Amravati again at the epicenter of suicides; Explosion of farmer suicides in 14 districts in the state

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
पश्चिम विदर्भातशेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबलेले नाही. ऑगस्ट महिन्यात तब्बल १०१ शेतकरी अस्मानी, सुलतानी संकटाचे बळी ठरले आहेत. या ३१ दिवसांत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ४४, अमरावतीत २३ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या दोन जिल्ह्यांत होत असल्याचे धगधगते वास्तव आहे.

विभागात सन २००१ पासून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्यांची नोंद घेतली जाते, त्यानुसार आतापर्यंत २१,८५४ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. यामध्ये शासन मदतीसाठी १०,२५० प्रकरणे पात्र ठरली तर त्यापेक्षा जास्त ११,३२३ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. अद्याप २८१ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची विभागीय आयुक्त कार्यालयाची माहिती आहे.

नैसर्गिक आपत्ती, नापिकी, कर्जबाजारी, आजारपण यासह अन्य कारणांनी पश्चिम विदर्भातील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. अशा परिस्थितीत शासन योजनांचा लाभ त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. 'महाडीबीटी'मुळे गरजू शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव आहे. समुपदेशनासह अन्य प्रकल्पही कुचकामी ठरले आहेत. एकाही शेतमालास हमीभाव नाही, शेतीचा उत्पादन खर्च वाढता असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत असल्याचे चित्र आहे.

१४ जिल्ह्यांत आत्महत्यांचा ग्राफ वाढताच

राज्यात अमरावती विभागातील ५, मराठवाड्यातील ८ व नागपूर विभागातील वर्धा असे १४ जिल्हे शेतकरी आत्महत्याप्रवण म्हणून ओळखले जातात. या जिल्ह्यांमध्ये जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान आतापर्यंत ११८३ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात ५२० शेतकरी आत्महत्यांची नोंद झाल्याचा शेतकरी मिशन कार्यालयाचा अहवाल आहे.

११८३ शेतकरी आत्महत्या आठ महिन्यांत

  • अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यात १४३, अकोला १२४, यवतमाळ २३५, बुलढाणा १२२ व वाशिम जिल्ह्यात ८३ व वर्धा जिल्ह्यात १४४ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.
  • छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर १२८, जालना ५२, परभणी ७१, हिंगोली ४४, नांदेड १०४, बीड १७२, लातूर ५२, धाराशिव जिल्ह्यात ८५ शेतकरी आत्महत्या आहेत.

Web Title: Yavatmal-Amravati again at the epicenter of suicides; Explosion of farmer suicides in 14 districts in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.