लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा (अमरावती): तालुक्यातील अतिदुर्गम हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने एका गर्भवती महिलेला चक्क आरोग्य केंद्राच्या वहांड्यातच बाळाला जन्म द्यावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने मेळघाटातील आरोग्य सेवेचा बोजवारा पुन्हा एकदा उघड झाला आहे.
तालुक्यातील खुटिदा येथील रहिवासी प्रेमती सतीश बेठेकर यांना १३ जानेवारी रोजी प्रसूती कळा सुरू झाल्या. सकाळी ११:३० च्या सुमारास त्यांचे कुटुंबीय त्यांना तातडीने हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. मात्र, यावेळी आरोग्य केंद्रात ना वैद्यकीय अधिकारी हजर होते, ना कोणी कर्मचारी. काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर प्रसूती कळा असह्य झाल्याने अखेर प्रेमती यांची आरोग्य केंद्राच्या वहांड्यातच प्रसूती झाली. त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला.
प्रसूतीनंतरही बराच वेळ आरोग्य केंद्रात कोणीही फिरकले नाही. कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्याने अखेर हतबल झालेल्या कुटुंबाने माघारी फिरून महिलेला आणि नवजात अर्भकाला पुन्हा घरी नेले. या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राजकुमार पटेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधले, तसेच दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
म्हणे दवाखान्यात या प्रसूतीला...!
एकीकडे शासन मेळघाटात कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे भरदिवसा आरोग्य केंद्रात कर्मचारी नसणे हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे. केंद्रात प्रसूतीसाठी प्रयत्न करण्याचे आदेश नुकतेच आरोग्य सचिव न्यायालयाच्या आदेशानंतर आल्यावर त्यांनी दिले. मात्र, वादग्रस्त हतरू प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा वादात अडकले आहे.
दोषींवर निलंबनाची मागणी
राजकुमार पटेल यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या पत्रानुसार, हा प्रकार अत्यंत संतापजनक आणि बेजबाबदारपणाचा आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्या हतरू आरोग्य केंद्रातील संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन करून त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
"घटनेची माहिती मिळाली. यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत."- डॉ. स्वप्निल मालखेडे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी, मेळघाट
Web Summary : In Melghat, a pregnant woman delivered her baby in a health center's verandah due to absent doctors and staff. The family was forced to return home without medical assistance. Inquiry ordered after public outcry.
Web Summary : मेलघाट में, डॉक्टरों और कर्मचारियों की अनुपस्थिति के कारण एक गर्भवती महिला ने स्वास्थ्य केंद्र के बरामदे में बच्चे को जन्म दिया। चिकित्सा सहायता के बिना परिवार को घर लौटने के लिए मजबूर किया गया। सार्वजनिक आक्रोश के बाद जांच के आदेश दिए गए।