भूजलाचा वारेमाप उपश्यामुळे ११३२ गावांत विहीर खोदण्यास मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:26 IST2025-03-20T11:25:38+5:302025-03-20T11:26:21+5:30

Amravati : 'जीएसडीए'नुसार सेमिक्रिटिकल, क्रिटिकल, ओव्हर-एक्सप्लॉइटेड गावे

Well digging banned in 1132 villages due to excessive groundwater depletion | भूजलाचा वारेमाप उपश्यामुळे ११३२ गावांत विहीर खोदण्यास मनाई

Well digging banned in 1132 villages due to excessive groundwater depletion

गजानन मोहोड 
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
भूजलाचा वारेमाप उपसा, त्यातुलनेत पुनर्भरण होत नसल्याने भूजलस्तरात कमी येत आहे. यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाने 'स्टेज ऑफ डेव्हलपमेंट' जमिनीची चार प्रकारे वर्गवारी निश्चित केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील २००० पैकी ८१३ गावे सेफ झोनमध्ये आहेत, तर सेमिक्रिटिकल, क्रिटिकल, ओव्हर-एक्सप्लॉइटेड वर्गवारीत ११३२ गावे आहेत. या गावांमध्ये शासन योजनांच्या विहिरी खोदण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरण आणि राज्य भूजल विभाग भूजल पातळी आणि त्याच्या वापरावर आधारित भूजल क्षेत्रांचे वर्गीकरण करतात. जिल्ह्यातील दोन हजार गावांची पाणलोट क्षेत्रनिहाय विभागणी करण्यात आलेली आहे. या गावांमध्ये योजनांच्या विहिरी खोदण्यास मनाई असली तरी सामूहिक विहीर खोदण्यास मनाई नसल्याची माहिती जीएसडीएचे भूवैज्ञानिक प्रतीक चिंचमलातपुरे यांनी दिली. 


बोअरवेल खोदण्यासही प्रशासनाची मनाई
ओव्हर-एक्सप्लॉइटेड वर्गवारीतील ४७२ गावांमध्ये केवळ विहिरीच नव्हे तर बोअरवेलसुद्धा खोदण्यास मनाई आहे. या गावांमध्ये विहीर किंवा बोअरवेल खोदल्यास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा उपविभागीय महसूल अधिकारी यांच्याद्वारा कारवाई प्रस्तावित केल्या जाते. डार्क झोनमधील मोर्शी, वरुड तालुक्यांसह चांदूर बाजार तालुक्यातील काही गावांचा यामध्ये समावेश आहे.


पाणलोट क्षेत्र निश्चित करण्याची कार्यपद्धती

  • संबंधित क्षेत्रामधील सिंचन विहीरी, विंधन विहिरी, पाणीपुरवठ्याच्या विहिरींची माहिती तहसील व पंचायत समिती कार्यालयाद्वारा घेतली जाते.
  • पर्जन्यमान, भूजलपातळी, मान्सूनपूर्व व मान्सूनपश्चात झालेला पाऊस आदी गावनिहाय पाणलोटक्षेत्राची माहिती सॉफ्टवेअरद्वारे केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडे पाठविली जाते व पाण्याचा ताळेबंद तयार होतो.
  • स्टेज ऑफ डेव्हलपमेंटनुसार पाणलोट क्षेत्राची वर्गवारी ठरते. जमिनीत उपलब्ध पाण्यानुसार त्या क्षेत्रातील विहिरींची संख्या निश्चित होते.


विहिरीसाठी प्रतिबंध गावे
अचलपूर तालुक्यात १६७ गावे, अमरावती ७९, अंजनगाव सुर्जी ९१, भातकुली २७, चांदूर रेल्वे ८, चांदूरबाजार १५५, चिखलदरा ६४, दर्यापूर ६०, धामणगाव ६४, धारणी ९, मोर्शी ८६६, नांदगाव ८६, तिवसा १८ व वरूड तालुक्यात १३९ गावांमध्ये शासकीय योजनांच्या विहिरी खोदण्यास मनाई आहे.


अशी वर्गवारी
६० ते ७०% सेमिक्रिटिकल व्हिलेज
७० ते ८०% क्रिटिकल व्हिलेज
८० ते १००% ओव्हर-एक्सप्लॉइटेड

Web Title: Well digging banned in 1132 villages due to excessive groundwater depletion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.