वाँटेड दरोडेखोर तलवारसिंग राजापेठ पोलिसांकडून ट्रॅप
By प्रदीप भाकरे | Updated: July 17, 2025 17:26 IST2025-07-17T17:24:39+5:302025-07-17T17:26:08+5:30
शंभरावर गुन्हे दाखल : दहा वर्षांपासून यंत्रणेला देत होता गुंगारा, अकोला जिल्ह्यातून अटक

Wanted robber Talwar Singh trapped by Rajapeth police
अमरावती : शहर आयुक्तालयासह राज्यातील विविध पोलिस ठाण्यात चोरी, रॉबरी, दरोडा, खून व खुनाचा प्रयत्न असे शेकडो गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात आरोपीला राजापेठ पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील त्याच्या नायगाव या राहत्या घरातून अटक केली. १७ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. अब्दुल रशीद ऊर्फ तलवारसिंग अब्दुल हमीद (रा. नायगांव, मेहबुबिया मशीदजवळ, अकोला) असे अटक कुख्याताचे नाव आहे.
तलवारसिंग म्हणून गुन्हेगारी जगतात कुप्रसिद्ध असलेल्या अ. रशीदविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अलीकडे शहर आयुक्तालयसह वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर व रेल्वे पोलिस त्याच्या मागावर होते. त्याच्याविरुद्ध शेकडोच्या संख्येने गुन्हे दाखल असल्याने तो दहा वर्षांपासून न्यायालयीन तारखेवरदेखील हजर राहत नव्हता. त्यामुळे विविध पोलिस ठाण्यांत त्याच्याविरुद्ध पकड वारंट, प्रोक्लामेशन वॉरंटदेखील प्राप्त झाले आहेत. त्याला न्यायालयाने फरारसुद्धा घोषित केले आहे.
एक पाय घरात, दुसरा जेलमध्ये
आरोपी तलवारसिंग हा अट्टल व सराईत चोर असल्याने तो चोरीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत फिरत असतो किंवा कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यामध्ये जेलमधे असतो. त्यामुळे तो त्याच्या राहत्या घरी नायगाव येथे मिळून येत नव्हता. दरम्यान, १६ जुलै रोजी तो नायगाव परिसरात वावरत असल्याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. तत्क्षणी राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट यांनी हवालदार आशिष विघे, विक्रम देशमुख, जगदीश वानखडे, सतीश टपके, आबिद शेख, पूजा चंदनपत्री व विजय यादव यांना तातडीने अकोल्यात रवाना केले. वारंट पथकाने त्याला ताब्यात घेऊन राजापेठेत आणले. तलवारसिंग याला राजापेठ पोलिस ठाण्यात सन २०१८ मध्ये नोंद चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.