Umesh Kolhe Yusuf Khan: 'ही हत्या दहशत पसरविण्याच्या उद्देशानेच', महाराष्ट्रात खळबळ उडवणाऱ्या हत्या प्रकरणात न्यायालय काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 15:54 IST2026-03-21T15:50:34+5:302026-03-21T15:54:33+5:30
Umesh Kolhe Murder Case: खटल्यादरम्यान आणखी महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता आहे. तसेच खटल्याच्या शेवटी खान निर्दोष सुटेल, याबाबत शंका आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Umesh Kolhe Yusuf Khan: 'ही हत्या दहशत पसरविण्याच्या उद्देशानेच', महाराष्ट्रात खळबळ उडवणाऱ्या हत्या प्रकरणात न्यायालय काय म्हणाले?
Murder of Umesh Kolhe: विशेष राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) न्यायालयाने २०२२मध्ये अमरावतीतील औषध विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कथित सूत्रधार असलेल्या इरफान खान याचा आरोपमुक्ततेचा अर्ज फेटाळला. ही हत्या दहशत पसरवण्याच्या स्पष्ट उद्देशाने करण्यात आली असून, विशेषतः हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे हा गुन्हा बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) तसेच भारतीय दंड संहितेअंतर्गत दहशतवादी कृत्य म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे.
विशेष न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी म्हटले की, आतापर्यंत समोर आलेले पुरावे म्हणजे 'हिमनगाचे केवळ टोक' आहे आणि खटल्यादरम्यान आणखी महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता आहे. तसेच खटल्याच्या शेवटी खान निर्दोष सुटेल, याबाबत शंका आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
ही हत्या २१ जून २०२२ रोजी करण्यात आली. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यांना समर्थन देणाऱ्या सोशल मीडिया पोस्टच्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
सुरुवातीला हा गुन्हा साधा खून म्हणून नोंदवण्यात आला होता. मात्र, नंतर एनआयएकडे सोपवण्यात आला. दहशत निर्माण करण्याच्या व्यापक कटाचा आरोप करत यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला.
आपत्तीजनक शब्दांचा वापर
बचाव पक्षाने हा गुन्हा साधा खून असून, त्यात दहशतवादाचा कोणताही हेतू नाही, असा युक्तिवाद केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळत म्हटले की, उपलब्ध पुराव्यांवरून एका विशिष्ट समाजात दहशत निर्माण करण्याचा स्पष्ट हेतू दिसून येतो. साक्षीदारांच्या जबाबांमध्ये खानने बैठकीदरम्यान आपत्तीजनक शब्दांचा वापर केल्याचे नमूद आहे.
खान ज्या गटाचा सदस्य होता, त्या गटाने बैठका घेतल्या, लोकांना एकत्र केले आणि कोल्हे यांच्या हत्येचा कट रचला. तसेच हल्लेखोरांना आर्थिक व लॉजिस्टिक मदत पुरविली आणि त्यांना अटक टाळण्यास मदत केली, असा आरोप एनआयएने केला आहे.
खानचा कोल्हेवर राग नव्हता, पण...
खानचा राग फक्त कोल्हे यांच्यावर नव्हता, तर संपूर्ण हिंदू समाजाविरूद्ध होता. कोल्हे यांची हत्या करून व्यापक हिंदू समाजाला संदेश देण्याचा त्याचा उद्देश होता, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला.
तसेच, यूएपीएच्या कलम १५नुसार दहशतवादी कृत्य ठरवण्यासाठी बंदी घातलेल्या संघटनेचा सहभाग आवश्यक नसतो; व्यक्तीगत स्तरावरही दहशत निर्माण करण्याच्या हेतूने असे कृत्य केले जाऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. साक्षीदारांचे जबाब आरोपीचा दहशतवादी हेतू सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत.
आरोपी रहेबर हेल्पलाइन या मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेशी संबंधित होता, कोल्हे यांच्याशी त्याचे कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते. तरीसुद्धा त्याने त्यांच्या हत्येच्या कटात सहभाग घेतल्याचे न्यायालयाने नमूद केले.