अमरावती जिल्ह्यात गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान, धारणीत दोन डॉक्टर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 19:56 IST2018-02-11T19:55:53+5:302018-02-11T19:56:25+5:30
रविवारी पहाटेदरम्यान अमरावती जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे रबी पिकांना जबर फटका बसला. दर्यापूर तालुक्यात वीज पडून एका शेतक-याचा मृत्यू झाला. धारणी तालुक्यात गारपिटीत सापडल्याने दोन डॉक्टर जखमी झाले.

अमरावती जिल्ह्यात गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान, धारणीत दोन डॉक्टर जखमी
अमरावती - रविवारी पहाटेदरम्यान अमरावती जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे रबी पिकांना जबर फटका बसला. दर्यापूर तालुक्यात वीज पडून एका शेतक-याचा मृत्यू झाला. धारणी तालुक्यात गारपिटीत सापडल्याने दोन डॉक्टर जखमी झालेत. वरूड तालुक्यात आठ जनावरे दगावली. गारपिटीने संत्रा पिकासह गहू, हरभरा, कांदा, तूर या पिकांचे नुकसान झाले. केळीबागांनाही याचा फटका बसला. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी नुकसानीचे पंचनामे करावे, असे आदेश दिले आहे.
गारपीट झाल्याची नोंद अंजनगाव, दर्यापूर, अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, भातकुली, धारणी या तालुक्यात झाली. अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी व वरूड येथील संत्राबागांचे गारपिटीने व अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. गहू पिकाला जबर फटका बसला. दर्यापूर तालुक्यातील नायगाव येथे गंगाधर आत्माराम कोकाटे (७६) या शेतकºयाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. धारणी तालुक्यातील धूळघाट रेल्वे परिसरात भरारी पथकातील डॉक्टर अहीरकर व डॉ. शेख गारपिटीत जखमी झाले, तर गारांच्या वर्षावाने अॅब्युलंसच्या काचा फुटल्या. वरूड तालुक्यातील वाई येथे चराईसाठी जाणारी सात जनावरे वीज पडून दगावली, तर तुटलेल्या जिवंत तारांच्या स्पर्शाने एका बैलाचा मृत्यू झाला. वरूड व भातकुली तालुक्यात झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
महसूल विभागाने नुकसानीची पाहणी करून संबंधिताना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी नुकसानीची पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. चांदूरबाजार तालुक्यात आमदार बच्चू कडू यांनी तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्यासह रविवारी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केला. नुकसानीचे पंचानामे करण्याच्या सूचना आमदार कडू यांनी चांदूरबाजार तहसीलदारांना दिल्या. आमदार अनिल बोंडे, रमेश बुंदिले यांनीदेखील त्यांच्या मतदारसंघात गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना केल्यात. हवामान खात्याने १० ते १३ फेब्रुवारीदरम्यान पावसाची शक्यता वर्तविली होती.