प्रदीप भाकरे, अमरावती: अकोली परिसरातील म्हाडा कॉलनी गुरुवारी रात्री दहशतीचा केंद्रबिंदू ठरली. एका अवैध दारू विक्रेत्याने महापालिकेच्या कारवाईचा सूड उगवण्यासाठी चक्क पाण्याच्या टाकीचा आश्रय घेतला आणि तिथून खाली असलेल्या पोलीस व नागरिकांच्या दिशेने जळते बोळे व ज्वलनशील पदार्थांच्या बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडा कॉलनी परिसरात शिवा नामक व्यक्तीचा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय आहे. दोन ते तीन खोक्यांच्या आडोशाने हा काळाबाजार सुरू होता. चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी दारू पिऊन झालेल्या वादातून एका व्यक्तीचा खून झाला होता, ज्यामुळे स्थानिक महिलांमध्ये तीव्र संताप होता. महिलांच्या आक्रमक मागणीनंतर आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने या अवैध खोक्यांवर हातोडा चालवला.
आपला अड्डा उद्ध्वस्त झाल्याचा राग मनात धरून शिवा हा रात्री १०:३० च्या सुमारास कॉलनीतील उंच पाण्याच्या टाकीवर चढला. तेथून त्याने 'शोले' स्टाईल आंदोलन तर केलेच, पण त्याचे स्वरूप हिंसक होते. त्याने सोबत आणलेले जळते बोळे आणि पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थांच्या बाटल्या खाली फेकल्या. काही प्रत्यक्षदर्शींच्या मते त्याने सिलिंडर फेकल्याचीही चर्चा होती, मात्र पोलिसांनी त्याला दुजोरा दिला नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, खोलापुरी गेटचे ठाणेदार आणि मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनीही घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. आरोपी शिवा हा बडनेरा रेल्वे स्थानकावरून पळ काढण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी संपूर्ण शहरात आणि बडनेरा परिसरात कडक नाकाबंदी केली आहे.
रात्री ११:३० वाजेपर्यंत म्हाडा कॉलनीत तणावाचे वातावरण होते. अशा गुन्हेगारांमुळे आमच्या वस्तीत सुरक्षितता उरलेली नाही. शिवाला तातडीने अटक करून त्याच्या सर्व अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी अंकुश लावा, अशी मागणी संतप्त महिलांनी डीसीपी शिंदे यांच्याकडे केली आहे.
Web Summary : In Akoli, an illegal liquor vendor, retaliating against authorities, threw Molotov cocktails from a water tank, creating chaos. This followed demolition of his illicit business after resident complaints about related violence. Police are searching for the suspect.
Web Summary : अकोली में, एक अवैध शराब विक्रेता ने अधिकारियों से बदला लेने के लिए पानी की टंकी से ज्वलनशील पदार्थ फेंके, जिससे अराजकता फैल गई। यह निवासियों की हिंसा संबंधी शिकायतों के बाद उसके अवैध कारोबार को ध्वस्त करने के बाद हुआ। पुलिस संदिग्ध की तलाश कर रही है।