१,२९१ गावांत पेटणार पाणी; प्रस्तावित उपाययोजनांच्या दिरंगाईने दाहकतेत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 13:33 IST2022-04-18T13:29:44+5:302022-04-18T13:33:50+5:30
पाणीटंचाईची तीव्रता मार्चनंतर वाढत जाते. किंबहुना दरवर्षी १०० वर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातुलनेत यंदा भूजल स्तर खालावला नसल्याने टँकरची संख्या कमी राहील.

१,२९१ गावांत पेटणार पाणी; प्रस्तावित उपाययोजनांच्या दिरंगाईने दाहकतेत भर
अमरावती : उन्हाळ्याच्या झळा लागताच जलस्रोत कोरडे पडत असल्याने पश्चिम विदर्भातील १,२९१ गावांमध्ये एप्रिलपश्चात पाणी पेटणार असल्याची चिन्हे आहेत. प्रस्तावित उपाययोजनांच्या दिरंगाईने दाहकतेत भर पडली आहे. सध्या ३७.८५ कोटी रुपयांच्या २,६२३ उपाययोजनांची मात्रा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने योजली आहे. यामध्ये नळ योजनांसह टँकरची कामे निविदा प्रक्रियेत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
पाणीटंचाईची तीव्रता मार्चनंतर वाढत जाते. किंबहुना दरवर्षी १०० वर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातुलनेत यंदा भूजल स्तर खालावला नसल्याने टँकरची संख्या कमी राहील. ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पावसाने जमिनीचे पुनर्भरण झालेले आहे. काही भागात याचे सुखद परिणाम दिसत आहेत.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील १४३ गावांमध्ये २६५ खासगी विहिरींचे अधिग्रहण, ३३ टँकर, १६५ नळयोजनांची विशेष दुरुस्ती, १४९ नवीन विंधन विहीर व १८ तात्पुरत्या नळयोजना तयार करण्यात येणार आहे. यावर १२.६० कोटींचा निधी खर्च होईल. अकोला जिल्ह्यातील १७९ गावांमध्ये १४० खासगी विहिरींचे अधिग्रहण, सहा नळयोजनांची दुरुस्ती, ३६ विंधन विहिरी व तात्पुरत्या पूरक पाच नळयोजना तयार करण्यात येणार आहे. या १८८ उपाययोजनांवर १.९४ कोटींंचा निधी खर्च होणार आहे.
या आहेत उपाययोजना
पाणीटंचाईसाठी बुलडाणा जिल्ह्यातील ३९९ गावांमध्ये चार विहिरी खोल करणे. ३४१ खासगी विहिरींचे अधिग्रहण, ४० टँकरद्वारे पाणीपुरवठा व ९२ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे. अशा ४९८ उपाययोजनांवर ३.३१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यवतमाळ जिल्ह्यात टंचाईग्रस्त २९६ गावांमध्ये २७८ खासगी विहिरींचे अधिग्रहण, २९ टँकर अशा एकूण ३०७ उपाययोजनांवर २.१६५ कोटींचा निधी अपेक्षित आहे. याशिवाय वाशिम जिल्ह्यातील २७४ गावांत २०१ विहिरींचे अधिग्रहण, १३ टँकर अशा एकूण २४५ उपाययोजनांवर १.५६ कोटींचा खर्च होईल.
जलप्रकल्पात ५० टक्क्यांवर उपयुक्त साठा
सद्यस्थितीत प्रमुख प्रकल्पांमध्ये अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५४.९७ टक्के, यवतमाळातील पूसमध्ये ४२.४० टक्के, अरुणावती ३८.०८, बेंबळा ५७.३०, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ४४.२७ टक्के, वान ५३.६२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा ४०.०८ टक्के, पेनटाकळी ५४.०६ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात २३.१९ टक्के जलसाठा आहे. याशिवाय मध्यम प्रकल्पातही ५० ते ६० टक्क्यांदरम्यान जलसाठा उपलब्ध आहे.