आधीच रस्ते उठले जीवावर, त्यात एसटीतूनही निघतो धूर ! प्रवासी कमालीचे संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 18:19 IST2025-10-17T17:45:18+5:302025-10-17T18:19:27+5:30
Amravati : राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या बसमधून निघाला धूर

The roads are already in danger, smoke is also coming out of the ST! Passengers are extremely angry
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अमरावतीहून परतवाडाकडे येणाऱ्या अमरावती आगाराच्या बसमधून बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक धूर निघायला सुरुवात झाली. चालकाने बस थांबवली. प्रवासी सुखरूप खाली उतरले. सुदैवाने कुठलीच अनुचित घटना घडली नाही. मात्र, नेहमीच्या या प्रकाराने प्रवासी कमालीचे संतप्त झाले.
परतवाडा-अमरावती मार्गावरून सर्वाधिक प्रवासी वाहतूक आहे. आधीच रस्ते जिवावर उठले असताना नेहमीप्रमाणे परिवहन महामंडळाच्या बसमधून जीवघेणा प्रवास नागरिकांना करावा लागत आहे. बुधवारी रात्री ८ वाजता अमरावती आगाराची साधारण बस आष्टी नजीक येताच धूर निघायला सुरुवात झाली. प्रवाशांच्या लक्षात येताच बसचालकाने थांबवून प्रवासी बाहेर काढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
ढकलून सुरू करूनही बसमधून निघाला धूर
महामंडळाच्या बसगाड्या भंगार असताना बुधवारी अचानक बंद पडलेली बस प्रवाशांनी ढकलून सुरू केली. पुढे जाताच त्यातून पुन्हा धूर निघाला असल्याचे बसमधील प्रवासी शेख मोहसीन शेख मोबीन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. प्रवाशांना मागून लागलीच आलेल्या ईव्ही बसमध्ये पुढील प्रवास करावा लागला, अन्यथा अर्धा ते एक तास मार्गावर पुढील बसची वाट बघत ताटकळत बसावे लागले असते.
नादुरुस्त बस रस्त्यावर धावतात तरी कशा?
परतवाडा आणि अमरावती हे दोन्ही आगार जिल्ह्यात मोठे आहे. स्वतंत्र वर्कशॉप (दुरुस्तीसाठी यंत्रणा) याठिकाणी आहे. त्यामुळे वेळेपूर्वीच कालबाह्य झालेल्या बसगाड्या या मार्गावरून पाठविल्या जातात. कधी चाक निघून पडू लागतात, तर धावत्या बसमधून धूर निघतो. नादुरुस्त बस मार्गावरून धावून प्रवाशांच्या जिवाशी आगर खेळत असल्याचा संतापजनक प्रकार सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.