अमरावती/वरूड : विदर्भामध्ये स्पायडरमॅन म्हणून कुख्यात असलेल्या व १०० पेक्षा अधिक चोरी घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत घरफोड्याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. १० मे रोजी त्याला नागपूर जिल्ह्यातील कोंढाळीलगतच्या सालई या गावातून अटक करण्यात आली. राम ऊर्फ स्पायडर दिनेश मडावी (३५, रा. सालई, कोंढाळी, ता. काटोल, नागपूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने बेनोडा ठाण्यात नोंदविलेले दोन आणि वरुड व शेंदूरजनाघाट ठाण्यात नोंदविलेला प्रत्येकी एक अशा चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याला बेनोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपी स्पायडरने चोरी केलेले सोन्याचे दागिने सोनाराला विकले होते. त्या संबंधित सोनाराकडून ३.८५ लाख रुपये किमतीची ४३ ग्रॅम सोन्याची लगड, ४७५ ग्रॅम चांदीची लगड व गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोपेड असा एकूण ५ लाख १२ हजार ३४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. साथीदार सागर श्रावण कलमरे (रा. सालई) याच्यासोबत वरूड तालुक्यातील अलोडा, लोणी, लिंगा व पिपलागड येथे घरफोडी केल्याच्या कबुलीसह चोरीचे सोने आपण नागपूर जिल्ह्यातील दाभा येथील सोनाराला विकल्याचे त्याने एलसीबीला सांगितले. विशेष म्हणजे, शहर पोलिसांच्या क्राइम युनिटने त्याला गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. तेव्हा त्याने शहरातील पाच गुन्ह्यांची कबुली दिली होती. त्यापूर्वी गाडगेनगर पोलिसांनीही त्याला अटक केली होती. आता एलसीबी पथकाने स्पायडरला अटक करून वरूड तालुक्यातील चार गुन्हे उघड केले आहेत.////////
आलोडा येथे केली होती घरफोडीबेनोडा ठाण्याच्या हद्दीतील आलोडा येथील विमलाबाई कोडस्कर (६०) यांचे घर फोडून अज्ञाताने ३४ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख ३५ हजार असा एकूण २.३७ लाखांचा ऐवज लांबविला होता. ३० एप्रिल रोजी ती घटना उघड झाली होती. त्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना ती घरफोडी राम मडावी ऊर्फ स्पायडरने केल्याची माहिती १० मे रोजी एलसीबीला मिळाली. त्या आधारे त्याला त्याच्या जावयाच्या घरून अटक करण्यात आली.