'त्या' दिवंगत व्यक्तीच्या वारसांना मिळेल शासकीय नोकरी; कोण असेल पात्र कुटुंबीय, वारसदार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:14 IST2025-11-24T16:13:34+5:302025-11-24T16:14:25+5:30
Amravati : खून, अत्याचार प्रकरणातील 'त्या' दिवंगतांच्या वारसांची शासनाकडून दखल

The heirs of 'that' deceased person will get a government job; who will be the eligible family members, heirs?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यू प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला शासकीय व निमशासकीय पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरी मिळणार आहे. यासंदर्भात राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने २० नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यपद्धतीच्या अंमलबजावणीसाठी परिपत्रक जारी केले आहे.
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने १४ एप्रिल २०१६ रोजी लागू केलेल्या अधिसूचनेनुसार, राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने २३ डिसेंबर २०१६ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. यात दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला गट 'क' व गट-'ड' संवर्गातील पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती देणे आणि त्याबाबतच्या कार्यपद्धतीला शासन मान्यता देण्यात आली आहे.
प्रकरणे ८८९ प्रलंबित
समाजकल्याण आयुक्तांच्या अहवालानुसार, जुलै २०२५ पर्यंतची एकूण ९३३ प्रकरणे खून, मृत्यूची आहेत. त्यापैकी यापूर्वी नोकरी दिलेली ४४ प्रकरणे वगळता ८८९ प्रकरणे नोकरी देण्याकरिता प्रलंबित आहेत. अनुसूचित जातीची ७३८ आणि अनुसूचित जमातीची १५१ प्रकरणे असून, प्रलंबित प्रकरणांना ही कार्यपद्धती लागू आहे.
...अन्यथा ४ एकर कोरडवाहू, दोन एकर बागायती शेतजमीन
दिवंगत व्यक्तीच्या वारसदाराला शासकीय व निमशासकीय नोकरी देऊन त्यांचे पुनर्वसन करणे अपेक्षित आहे. मात्र, दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबात एकही वारसदार व्यक्ती नियुक्तीसाठी पात्र नाही किंवा कुटुंबातील पात्र वारसदार नोकरी करण्यास तयार नसेल अथवा एकही पात्र वारसदार उपलब्ध नसेल, अशा परिस्थितीत कोणालाही नोकरी देणे शक्य होत नसल्यास संबंधित कुटुंबासला ४ एकर कोरडवाहू लागवडीयोग्य शेतजमीन किंवा २ एकर बागायती शेतजमीन देऊन पुनर्वसन करावे लागणार आहे
नोकरी मिळण्यासाठी आवश्यक परिस्थिती
दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला आरोपपत्र दाखल झाल्यानंतर किंवा ज्या प्रकरणात विहित कालावधीत आरोपपत्र दाखल झाले नाही, अशा प्रकरणात प्रथम खबरी अहवाल नोंदवल्यानंतर ९० दिवसांच्या आत जे अगोदर घडेल त्यानुसार नोकरी देण्यात येईल. एका पात्र वारसदाराने वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे. वारसदाराने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावीत. वयाची ४५ वर्षे पूर्ण होईपर्यंत नियुक्ती न मिळाल्यास अशा वारसदाराचे नाव प्रतीक्षा सूचीतून वगळण्यात येईल.
असे असतील नोकरीसाठी पात्र कुटुंबीय, वारसदार
वारसदार व्यक्तींपैकी एका व्यक्तीला नोकरी मिळणार आहे. यात दिवंगत व्यक्तीची पत्नी वा पती, विवाहित वा अविवाहित मुलगा, मुलगी तसेच मृत्यूपूर्वी कायदेशीररीत्या दत्तक घेतलेला मुलगा वा मुलगी, दिवंगत व्यक्तीची सून, दिवंगत व्यक्तीची घटस्फोटित विधवा, परित्यक्ता मुलगी अथवा घटस्फोटित विधवा, परित्यक्ता बहीण अथवा दिवंगत अविवाहित असल्यास भाऊ अथवा बहीण यांचा समावेश असेल.