मुंबई- नागपूर दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 19:55 IST2019-03-28T19:54:25+5:302019-03-28T19:55:31+5:30
उन्हाळ्यात लग्नसोहळे, परीक्षा आटोपताच शाळा- महाविद्यालयांना सुट्या आणि सहलीचे नियोजन आखत असताना नागरिकांना रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असल्याचा सामना करावा लागत आहे

मुंबई- नागपूर दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या
अमरावती : उन्हाळ्यात लग्नसोहळे, परीक्षा आटोपताच शाळा- महाविद्यालयांना सुट्या आणि सहलीचे नियोजन आखत असताना नागरिकांना रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असल्याचा सामना करावा लागत आहे. मात्र, मध्य रेल्वे विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर दरम्यान उन्हाळी सुट्टीनिमित्त चार विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. १५ एप्रिलपासून या गाड्या सुरू होतील,असे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
मुंबई ते नागपूर गाडी क्रमांक ०१०७५ ही गाडी १५ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता मुंबईहून सुटेल. तर ही गाडी बडनेरा रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री १०.४३ वाजता पोहचेल. नागपूर रेल्वे स्थानकावर मंगळवारी रात्री २.४५ मिनिटांनी ही गाडी पोहचणार आहे. ही गाडी मुंबई येथून दर सोमवारी सुटणार आहे. नागपूर ते मुंबई गाडी क्रमांक ०१०७६ ही साप्ताहिक गाडी नागपूर येथून दर मंगळवारी सकाळी ६.५० वाजता सुटेल. बडनेरा रेल्वे स्थानकावर सकाळी ९.४५ मिनिटांनी पोहचेल. तर मुंबई रेल्वे स्थानकावर रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी पोहचणार आहे. १५ एप्रिल ते २ जुलै २०१९ दरम्यान आठवड्याला ही रेल्वे धावणार आहे. ही एक्सप्रेस गाडी १७ डब्यांची असून, १२ स्लिपर, २ जनरल आणि २ एसएलआर डबे असतील.
मुंबई ते नागपूर समर स्पेशल गाडी क्रमांक ०२०२१ ही १४ एप्रिलपासून दर आठवड्याला धावणार आहे. दर शनिवारी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी मुंबई येथून सुटणार आहे.बडनेरा रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी पोहचेल. तर नागपूर येथे रविवारी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी पोहचेल. तसेच नागपूर ते मुंबई समर स्पेशल गाडी क्रमांक ०१०७४ ही दर आठवड्यातून नागपूर येथून रविवारी दुपारी ४ वाजता सुटेल. बडनेरा रेल्वे स्थानकावर सायंकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी पोहचणार आहे. मुंबई येथे सोमवारी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी पोहचेल. ही गाडी १४ एप्रिल ते ३० जून या दरम्यान धावणार आहे.
या स्थानकावर असणार थांबा
मुंबई ते नागपूर या दरम्यान समर स्पेशल चार गाड्या सुरू होत आहे. ही एक्सप्रेस गाडी असून, मुंबई, दादर, कल्याण, ईगतपुरी, नाशिक, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, वर्धा, नागपूर असे स्थानकावर थांबे देण्यात आले आहे.