मेळघाटात भवईजवळ अपघात; झाडामुळे बचावले ६४ प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 16:01 IST2023-06-12T15:59:58+5:302023-06-12T16:01:23+5:30
चालकासह दहा किरकोळ जखमी

मेळघाटात भवईजवळ अपघात; झाडामुळे बचावले ६४ प्रवासी
नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : अमरावतीहून मध्यप्रदेशातील खंडवा येथे जाणाऱ्या एसटीला मेळघाटच्या सेमाडोहनजीक भवई गावाजवळ सोमवारी सकाळी १०.१५ वाजता अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी ही बस वळणावर एका कडेला कोसळली. २५ ते ३० फूटपर्यंत दरीत गेली. नशीब बलवत्तर म्हणून बस झाडाला अडकल्याने ६४ प्रवाशांचे प्राण वाचले.
अमरावती खंडवा ही एम एच १४ बीटी ४९७६ क्रमांकाची परिवहन मंडळाची बस अमरावतीहून खंडवाकडे जात होती. दरम्यान, एअर ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चौकशीअंती अपघाताचे कारण पुढे येणार आहे. या अपघातात चालक शेख मुजाहिदिन सह दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी तत्काळ दखल घेत पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ मदतीसाठी तैनात केले. रुग्णवाहिका सुद्धा पाठविण्यात आली. किरकोळ जखमी चालक व प्रवाशांना धारणी व परतवाडा येथे पाठविण्यात आले. या घटनेने सोशल मीडियावर उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.