लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तीन-साडेतीन वर्षापासून मंदीच्या गर्तेत अडकलेल्या सोयाबीन दराने अखेर उसळी घेतली आहे. जिल्ह्यासह राज्यातील बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे दर ५,१०० ते ५३०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच सोयाबीनने पाच हजारांचा टप्पा ओलांडल्याने बाजारपेठेत तेजीचे वातावरण आहे.
हमीभाव योजनेंतर्गत 'नाफेड'कडून जिल्ह्यात १६ केंद्रांवर सोयाबीन खरेदी केंद्र सुरू आहे. येथे ५,३२८ रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. मात्र, खासगी बाजारात सोयाबीनच्या दराने उसळी घेतल्याने हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. नाफेड आणि खासगी व्यापाऱ्यांचे दर १०० ते २०० रुपयांचे दरम्यान कमी-अधिक आहे. त्यामुळे केंद्रापेक्षा खासगी बाजारात शेतकरी आपला माल आणत आहेत. अशा परिस्थितीत 'डीओसी'ची मागणी वाढली, शिवाय सरकी देखील महागली. त्यामुळे सोयाबीनला उठाव आला. अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांमध्ये हवामानातील बदल, उत्पादन अंदाजात घट आणि निर्यातीवरील मर्यादा यामुळे जागतिक बाजारात दर वाढल्याचे बोलले जात आहे.
सोयाबीन शेतकऱ्यांकडील संपल्यावर झाली दरवाढ
आर्थिक अडचणीमुळे ७० ते ७५ टक्के शेतकन्यांनी सोयाबीन आधीच विकून टाकले आहे. आता केवळ मोठ्या शेतकऱ्यांकडे थोडाफार साठा शिल्लक असताना दरवाढ झालेली आहे.
तीन वर्षांनंतर वाढले दर आवक मात्र कमी
तीन वर्षांपासून सोयाबीनचे दर ३,८०० ते ४,२०० रुपयांदरम्यान स्थिर होते. खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. मात्र, सध्या दराने ५,३०० रुपयांची पातळी गाठली आहे. २०२१-२२ नंतर प्रथमच अशी तेजी पाहायला मिळत आहे.
१५ दिवसांत इतक्या रुपयांनी वधारला दर
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ दिवसांत क्विंटलमागे ५०० ते ८०० रुपयांची भाववाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात सरासरी ४६०० ते ५,३०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
साठेबाजांचे फावणार?
शेतकऱ्यांनी माल विकल्यानंतर दर वाढण्याची ही जुनीच पद्धत यंदाही पाहायला मिळत आहे. आता व्यापाऱ्यांकडील आणि साठेबाजांकडील सोयाबीनला चांगला दर मिळणार असल्याने 'शेतकऱ्यांचे नुकसान आणि साठेबाजांचा फायदा' अशी स्थिती आहे.
पुढील काही दिवस दरात तेजी राहणार
आठवडाभरापासून सोयाबीन तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे, तर दुसरीकडे बाजारात सोयाबीनची आवक मंदावली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सोयाबीनच्या दरात तेजी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तेल उद्योगांकडून मागणी वाढली
खाद्यतेलाच्या दरांमध्ये चढ-उतार सुरू असताना तेलाची मागणी वाढली आहे. तेल गिरण्या आणि प्रक्रिया उद्योगांनी कच्च्या मालासाठी अधिक खरेदी सुरू केल्याने बाजारात स्पर्धा वाढली, सोयापेंडचे दर वाढले, सरकीची दरवाढ झाली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे.
सोयाबीन भाववाढीमागे नेमकी कारणे काय?
जागतिक बाजारपेठेत सोयापेंड आणि तेलाच्या मागणीत वाढ झाली आहे. यासह बाजारात सोयाबीनची आवक मंदावली असल्याने दरात तेजी आली आहे. तसेच सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात झालेली घट हेदेखील एक प्रमुख कारण मानले जात आहे.
"तीन वर्षांनी सोयाबीनला भाव चांगला मिळतोय; परंतु शेतकऱ्यांजवळ साठवणुकीतील सोयाबीन शिल्लक नाही. अडचणीतील शेतकऱ्यांना मातीमोल भावाने सोयाबीन विकावे लागले."- रमेश ठाकरे, शेतकरी.
Web Summary : Soybean prices surged past ₹5,000 per quintal after three years of slump. Reduced supply, increased oil demand, and global market factors fueled the price rise. Farmers, however, have already sold most of their stock. Traders and stockists are likely to benefit most.
Web Summary : तीन साल की गिरावट के बाद सोयाबीन की कीमतें ₹5,000 प्रति क्विंटल से ऊपर पहुंच गईं। कम आपूर्ति, तेल की बढ़ती मांग और वैश्विक बाजार के कारकों ने कीमतों में वृद्धि को बढ़ावा दिया। किसानों ने हालांकि, पहले ही अपना अधिकांश स्टॉक बेच दिया है। व्यापारियों और स्टॉकिस्टों को सबसे अधिक लाभ होने की संभावना है।