... म्हणून 'मोझरी'तून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सुरू, पालकमंत्र्यांचा पूर्वतयारी दौरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 20:45 IST2019-07-25T20:41:42+5:302019-07-25T20:45:39+5:30
मुख्यमंत्र्यांच्या नियोजित सभेच्या अनुषंगाने आढावा दौरा

... म्हणून 'मोझरी'तून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सुरू, पालकमंत्र्यांचा पूर्वतयारी दौरा
अमरावती - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या 1 ऑगस्ट रोजी मोझरी येथे दौऱ्याच्या अनुषंगाने पालकमंत्री तथा कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पूर्वतयारीचा आढावा मोझरी येथील गुरुकुंज आश्रमात घेतला. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार सर्वश्री अरुण अडसड, रमेश बुंदिले, रामदास आंबटकर, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरजीत सिंग ठाकूर, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, निवेदिता चौधरी, तुषार भारतीय, संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, शिवराय कुलकर्णी, जयंत डेहणकर, किरण पातुरकर, विभागीय आयुक्त पियूष सिंह,पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, मनपा आयुक्त संजय निपाणे आदी उपस्थित होते.
ग्राम परिवर्तनाचा पाया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचला. त्यामुळे मोझरी या संतभूमीतून महाजनादेश यात्रेची सुरुवात होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे मोठे स्वरूप, यावेळी होणारी गर्दी पाहता आवश्यक सुरक्षा यंत्रणा व आवश्यक सुविधा संबंधित सर्व विभागांनी यावेळी ठेवावी, असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी सभेच्या नियोजित ठिकाणाची पाहणी करून सुरक्षा व्यवस्था आदी दृष्टीने विविध निर्देश दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधून कार्यक्रमाबाबत माहिती दिली.
विदर्भ व मराठवाड्यात पाऊस कमी आहे. पुढील दोन तीन दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. मात्र, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी शासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. कठीण परिस्थितीत शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले.