साहेब, तो माझ्यासमोर दुसऱ्या महिला घरी आणतो हो! पोलिसांसमोर विवाहितेची आर्जव
By प्रदीप भाकरे | Updated: March 2, 2023 14:55 IST2023-03-02T14:49:31+5:302023-03-02T14:55:13+5:30
Amravati News: साहेब, मी त्याची लग्नाची बायको असताना तो माझ्यासमोरच दुसऱ्या महिला घरी आणतो, त्यांच्यासोबत राहतो. त्याच्या अशा या निर्लज्ज वागण्याने आपले जीवन जगणे मुश्किल झाले आहे. साहेब, त्याच्यावर कारवाई करा हो. ही आर्जव आहे एका विवाहितेची.

साहेब, तो माझ्यासमोर दुसऱ्या महिला घरी आणतो हो! पोलिसांसमोर विवाहितेची आर्जव
- प्रदीप भाकरे
अमरावती : साहेब, मी त्याची लग्नाची बायको असताना तो माझ्यासमोरच दुसऱ्या महिला घरी आणतो, त्यांच्यासोबत राहतो. त्याच्या अशा या निर्लज्ज वागण्याने आपले जीवन जगणे मुश्किल झाले आहे. साहेब, त्याच्यावर कारवाई करा हो. ही आर्जव आहे एका विवाहितेची. त्याने आपल्यामागे घटस्फोटाचा तगादा लावल्याचेही विवाहितेचे म्हणणे आहे.
१ मार्च रोजी सकाळी एक महिला शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पोहोचली. तिची फिर्याद घेताना महिला पोलीस अधिकाऱ्याने देखील तिला धीर दिला. तथा तिचा पती सचिन निवृत्ती शिंदे, एक महिला, सुभाष देसाई व विलास देसाई या चौघांविरूध्द पोलिसांनी कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला. येथील एका तरूणीचे मे २०१२ मध्ये सांगली जिल्ह्यातील सचिन शिंदेसोबत विवाह झाला. काही दिवस सासरी काढल्यानंतर तो पत्नीच्या माहेरी येऊन घरजावई राहू लागला. येथे राहत असताना तो सतत पत्नीला दारू पिऊन मारहाण करायचा. तथा सासु सासऱ्यांनी दारू पिण्यास पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा. त्यावेळी देखील तो तिला फारकतीची मागणी करायचा. दरम्यान त्याने नोव्हेंबर २०१५ मध्ये तिचा गळा दाबून मारण्याचाही प्रयत्न केला. आपल्या दुसऱ्या प्रसुतीचा खर्च न करता तो उलटपक्षी आपल्या आईवडिलांनाच गाडी घेण्याकरीता दोन लाख रुपये मागायचा, असे विवाहितेने म्हटले आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये तो त्याच्या सांगली जिल्ह्यातील गावात निघून गेला.
दुसऱ्या महिलांचे फोटो स्टेटसवर
आरोपी पती हा नेहमी दुसऱ्या महिलांना घरी आणतो, त्यांच्या सोबत राहतो. आपल्याला नेहमी फारकत मागतो, फोनवर सतत मारण्याची धमकी देतो. सोबतच त्याचे दोन मामा देखील त्याला फारकत घेण्यासाठी प्रवृत्त करतात, असा विवाहितेचा आरोप आहे. एवढेच कायतर आरोपी पती हा त्याच्या सोशल मिडियावर दुसऱ्या महिलांची त्याच्यासोबतची छायाचित्रे डीपीवर ठेवतो. त्याला त्याबाबत विचारणा केली असता, तो घातपात घडवून आणण्यासह मुलांना सोबत घेऊन जाण्याची धमकी देत असल्याचे विवािहतेने म्हटले आहे.