धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 10:38 IST2025-11-16T10:34:23+5:302025-11-16T10:38:40+5:30
प्रसूतीपूर्वीच माता दगावली तर बाळ पोटातच दगावले

धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
नरेंद्र जावरे, चिखलदरा: मेळघाटच्या धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात तीन बालकांसह गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले असताना आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा आदिवासी बालकांसह मातांच्या जिवावर बेतणारा ठरला. नर्मदा नारायण चिलात्रे (२०, रा. सालाईबर्डी) धुळघाट रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत राहणाऱ्या गर्भवतीला शनिवारी दुपारी २ वाजता धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. ही महिला गर्भवती असल्याची पहिलीच वेळ होती. प्रसूती होत नसल्याने सिजरसाठी नेण्यात आले असता तिला झटके आले. उपचार करण्यात आला. परत दोनवेळा झटके आले आणि प्रकृती खालावली. प्रसूतीपूर्वीच माता दगावली तर बाळ पोटातच दगावले.
आणखीही वाईट घटना
धुळघाट रेल्वे येथील श्रीराम धांडे यांच्या पत्नी कविताने जुळ्या अपत्यांना एक मुलगी व एक मुलगा जन्म दिला. परंतु, नवजात एका मुलाचा जन्मानंतर अल्पावधीतच मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत बैरागड येथील सबा तनवीर मो. नदीम यांना केवळ २८ आठवड्यांवर प्रसूती झाली. अकाली झालेल्या या प्रसूतीत सुमारे ८०० ग्रॅम वजनाचे मूल जन्माला आले. अत्यल्प वजन आणि नाजूक प्रकृतीमुळे वैद्यकीय उपचार सुरू असतानाही त्या बालकाचा मृत्यू झाला.
शनिवारी गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, तिला झटके आल्याने प्रकृती खालावली. महिला दगावली तर बाळ पोटात दगावले. सोबत अजून एक बाळाचा मृत्यू झाला आहे.
- डॉ. दयाराम जावरकर, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, धारणी