पश्चिम विदर्भातील ४६९ लघुप्रकल्पांत सात टक्के पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 19:37 IST2019-06-12T19:36:39+5:302019-06-12T19:37:10+5:30
जलसंपदा विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार पश्चिम विदर्भातील ४६९ लघु प्रकल्पांमध्ये फक्त ७.०४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने ज्या लघु प्रकल्पांमधून संबंधित गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतोे.

पश्चिम विदर्भातील ४६९ लघुप्रकल्पांत सात टक्के पाणीसाठा
अमरावती - जलसंपदा विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार पश्चिम विदर्भातील ४६९ लघु प्रकल्पांमध्ये फक्त ७.०४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने ज्या लघु प्रकल्पांमधून संबंधित गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतोे, त्या शेकडो गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. भविष्यात सदर प्रकल्प पूर्ण भरले नाहीत, तर यंदा सिंचनाची स्थितीसुद्धा बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
४६९ धरणांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ११००.७८ दलघमी आहे. पण, यंदा उन्हाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने व पाण्याची मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात सतत घट झाली असून, उपयुक्त पाणीसाठा हा ७७.५२ दलघमी एवढा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. यंदा चांगल्या अपेक्षित पावसाची प्रतीक्षा आहे.
२४ मध्यम प्रकल्पांत १७ टक्के पाणीसाठा
लघु प्रकल्पांसारखीच मध्यम प्रकल्पांचीसुद्धा स्थिती यंदा बिकट आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार विभागातील २४ मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त १६.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील तीन प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे, तर दोन प्रकल्पांमध्ये आठ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. अकोला तीन व वाशीम जिल्ह्यातील एका प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा असल्याने स्थिती बिकट आहे.