शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा दररोज नावेतून जीवघेणा प्रवास; पुलाच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2022 15:10 IST2022-07-29T14:56:56+5:302022-07-29T15:10:50+5:30
महिनाभरापासून तुटला शाळेशी संपर्क

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा दररोज नावेतून जीवघेणा प्रवास; पुलाच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष
संदीप राऊत
तिवसा (अमरावती) : अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर तिवसा तालुक्यातील ३५० लोकसंख्या वस्तीचे नमस्कारी गाव. दळणवळणाच्या सोयींचा अभाव, जेमतेम माध्यमिक शिक्षणाची सोय. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना सर्वस्वी वर्धा जिल्ह्यातील भारसवाडा या गावावर अवलंबून राहावे लागते. मात्र, दोन्ही गावांच्यामध्ये असलेल्या वर्धा नदीला पूर आला की, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन नावेतून शैक्षणिक प्रवास करावा लागतो. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आजतागायत या नदीवरील पुलाची मागणी पूर्ण न होणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे वास्तव अधोरेखित करणारे आहे.
दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीचे पात्र नावेतून ओलांडणे म्हणजे प्राणाची बाजी लावणे होय. अशा जोखमेतून नमस्कारी येथील २५ शालेय विद्यार्थ्यांचा खडतर शैक्षणिक प्रवास नावाड्याच्या नौकेवर झुलताना दिसतो आहे. तिवसा तालुक्यातील फत्तेपूर, इसापूर, काटपूर व नमस्कारी अशी चार गावांची सात सदस्यीय गटग्रामपंचायत. माध्यमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्यातील भारसवाडा या गावावर अवलंबून राहावे लागते.
विद्यार्थी अशाही परिस्थितीत नावेत बसून शाळेची वाट धरतात; परंतु लहानशा नावेतून नदी ओलांडताना विद्यार्थ्यांना खूप जोखीम पत्करावी लागते. नदीतील पाण्याचा अंदाज घेऊनच नावाडी नदीत नौका टाकतो. नागरिकांनासुद्धा दळणवळणासाठी या एकमेव नावेचा आधार आहे. शासनाने नदीवर पूल उभारावा, एवढीच मागणी गेल्या कित्येक दशकांपासून नागरिक करीत आहेत.
महिनाभरापासून अप्पर वर्धा धरणाचा विसर्ग वर्धा नदीत करण्यात येत आहे. पाणीपातळीत वाढ असल्यास विद्यार्थ्यांची नावच पुढे सरकत नाही. यामुळे शाळेशी संपर्क तुटला आहे. सन २००८ मध्ये तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य दिलीप काळबांडे यांनी तत्कालीन सीईओ मुथ्युकृष्णन शंकरनारायणन व तत्कालीन अतिरिक्त सीईओ के. एम. अहमद यांच्यामार्फत शासनाकडून नाव उपलब्ध झाली होती. कालांतराने ती नाव वापरण्यायोग्य राहिली नाही.
हा विषय जलसंपदा व अप्पर वर्धा विभागाच्या अखत्यारीत येतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासासोबतच तेथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. पुराच्या पाण्याने विहिरीवरून पाणी वाहून जाते. याबाबत आपण संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार करणार आहोत.
- वैभव फरतारे, तहसीलदार, तिवसा.