बाळाभाऊ कळसकर : संत तुकारामांच्या विचारांशी समरसअंजनगाव सुर्जी : एखादं पारंगत, सुशिक्षित व्यक्तीला लाजवेल, असे भाषेवर प्रभूत्व असलेले संत गाडगेबाबा एक उत्कृष्ट कीर्तनकार व अभिनेता होते, असे उद्गार ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत बाळाभाऊ कळसकर यांनी काढले. लोकदृष्टी सामाजिक संस्था व गाडगेबाबा विचार प्रसार केंद्राद्वारे शनिवारी आयोजित सात दिवसीय प्रबोधन यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोट को.आॅपरेटिव्ह बँकेचे निरीक्षक रामदास मंगळे, प्रमुख अतिथी म्हणून डोंबिवली मुंबईच्या उज्ज्वला करंडे, लोकदृष्टीचे संजय तिकडे, उपविभागीय अभियंता राजेंद्र डोंगरे, बसपाचे मनोहर धुरंधर आदी उपस्थित होते.प्रमुख वक्त प्रा. कळसकर म्हणाले, संत गाडगेबाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारात साम्य असून दोघांनी समाजातील अंधश्रद्धा, बुवाबाजी, अनिष्ठ रुढी, परंपरांना दुजोरा दिला. लोकांना त्यांच्यात भाषेत प्रश्न विचारून त्यांच्याच तोंडून सत्य वदवून घेण्याची कला गाडगेबाबांना अवगत होती. ते ज्ञानाचे व विद्वत्तेचे प्रतीक म्हणूनच विद्यापीठाला त्यांचे नाव मिळाले, असे त्यांनी सांगितले. यावेळी सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात सक्रिय कार्य करणारे राजकुमार फरकुंडे, दलितमित्र साहेबराव लेंधे, विश्वनाथ बायस्कर, दिलीप गाडगे, उद्योजक राजेंद्र जयस्वाल, शिक्षक हाजी अब्दूल गफ्फार, अमोल दातीर, कवी, साहित्यिक मनोहर चव्हाण आदींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचा शेवट 'होय मी सावित्रीबाई बोलतेय' या उज्ज्वला करंडे यांच्या कार्यक्रमाने झाला. संचालन पल्लवी भोगे, प्रास्ताविक विनीत डोंगरदिवे, नागेश गोळे, तर अभार विजय रायबोले यांनी मानले. कार्यक्रमासाठी अनिल महाजन, सुरेश सनीसे, सुरेश शिंदे, मदन थडकर, सुधीर जोशी, सचिन गावंडे आदींनी प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)
संत गाडगेबाबा उत्कृष्ट अभिनेता
By admin | Updated: January 4, 2016 00:12 IST