राजापेठ रेल्वे उड्डाण पुलासाठी धरणे
By Admin | Updated: November 3, 2014 23:18 IST2014-11-03T23:18:49+5:302014-11-03T23:18:49+5:30
राजापेठ येथील बहुप्रतीक्षित रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पूल निर्मितीच्या समस्येविषयी योग्य तो तोडगा निघावा तसेच वस्तुस्थिती नागरिकांना कळावी, यासाठी सोमवारी राजापेठ रेल्वे उड्डाण पूल

राजापेठ रेल्वे उड्डाण पुलासाठी धरणे
अमरावती : राजापेठ येथील बहुप्रतीक्षित रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पूल निर्मितीच्या समस्येविषयी योग्य तो तोडगा निघावा तसेच वस्तुस्थिती नागरिकांना कळावी, यासाठी सोमवारी राजापेठ रेल्वे उड्डाण पूल कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राजापेठ भागातील प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती.
कृती समितीचे मुन्ना राठोड, नितीन मोहोड, नगरसेवक दिनेश बुब, सुनील राणा यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर प्रस्तावित उड्डाण पूल निर्मिती ही काळाची गरज आहे. त्याकरिता यापूर्वी अनेक आंदोलन झालेत.
परिणामी राज्य शासन, रेल्वे प्रशासनाला राजापेठ येथे रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पूल निर्माण करण्याचा निर्णय घ्यावा लागला. मात्र या पुलाच्या निर्मितीसाठी यापूर्वी अनेकदा भूमिपूजनाचे सोहळे पार पडले. परंतु उड्डाण पुलाच्या निर्मितीचा अद्यापही मुहूर्त सापडला नाही, असा आरोप मुन्ना राठोड यांनी केला आहे. या पुलाच्या निर्मितीचे श्रेय आमदार, खासदारांनी घेतले.
मात्र हा पूल कधी निर्माण होणार? या पुलाच्या निर्मितीसाठी लागणारा निधी कोठून आणणार याची उकल कोणत्याही लोकप्रतिनिधींनी केली नाही. त्यामुळे कृती समितीचे धरणे आंदोलन रेल्वे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत याप्रकरणी काय केले, हे नागरिकांना कळावे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे मुन्ना राठोड यांनी सांगितले. दरम्यान रेल्वेचे अधिकारी विजयसिंह किल्लेदार, पी.डी. खडसे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या व्यथा जाणून घेतल्या.