हॉटेल आदित्यनजीकचा तो खड्डा बनतोय कर्दनकाळ; दुचाकी खड्डयात पडल्याने युवकाने गमावला जीव
By प्रदीप भाकरे | Updated: February 22, 2023 23:07 IST2023-02-22T23:05:59+5:302023-02-22T23:07:00+5:30
लग्नकार्यासाठी बहिणीच्या घरी जात असलेल्या भावाचा दुचाकी खड्ड्यात पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

हॉटेल आदित्यनजीकचा तो खड्डा बनतोय कर्दनकाळ; दुचाकी खड्डयात पडल्याने युवकाने गमावला जीव
अमरावती: लग्नकार्यासाठी बहिणीच्या घरी जात असलेल्या भावाचा दुचाकी खड्ड्यात पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज २२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान वडगाव माहोरे फाट्यावरील हॉटेल आदित्य नजीक घडली. सचिन बाबुराव सुरजूसे (२५ रा. मंगरूळ चव्हाळा) असे घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
वडगाव माहोरे फाट्यावरील हा खड्डा अनेकांचा कर्दनकाळ ठरत आहे. सचिन सुरजूसे यांची बहीण वडगाव माहोरे येथे राहत असून गुरुवारी बहिणीच्या दिराचे लग्न असल्याने त्या लग्नाला उपस्थित राहण्याकरिता सचिन त्याची दुचाकी क्र. एम एच२७ बी वाय ७८०३ ने वडगाव माहोरे येथे जाण्यासाठी निघाला. रात्री ८ वाजताच्या दरम्यान सचिन हॉटेल आदित्य नजीक वडगाव माहोरे फाट्यावरून जात असतांना त्याठिकाणी असलेल्या खड्डयात दुचाकी पडली आणि सचिन गंभीररीत्या जखमी झाला. अंधार असल्याने तसेच रात्रीची वर्दळ नसल्याने बराच वेळ पडून राहल्याने सचिनला अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
काही नागरिकांना सचिन पडलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी तातडीने नांदगाव पेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली व सचिनला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सचिनला मृत घोषित केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"