पिंकीचा मारेकरी पतीच ! तिला दारू पाजून बेशुद्धावस्थेत केले वार; म्हणतो ब्लॅकमेलिंगला कंटाळलो होतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:58 IST2025-12-03T12:56:09+5:302025-12-03T12:58:24+5:30
Amravati : दोन महिन्यांपूर्वी लग्न, घरी नेण्यासाठी टाकत होती दबाव

Pinky's killer is her husband! He made her drunk and hit her unconscious; says he was tired of blackmailing
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील गुरुकृपा कॉलनीतील नीलिमा ऊर्फ पिंकी खरबडे (४५) हत्याप्रकरणाचा शहर गुन्हे शाखेने उलगडा केला. तिची हत्या तिच्या दुसऱ्या पतीने नीलिमाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून केली. त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, सनी उर्फ नितीन इंगोले (३२, अशोक कॉलनी) असे नीलिमाच्या मारेकरी पतीचे नाव आहे. तो भूजल सर्वेक्षणच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात कार्यरत आहे. त्याच्याशी नीलिमाचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्यापूर्वी पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर ती एकटी राहत होती. नीलिमाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्याने तिच्यावर उखळाचा दगड आणि चाकूने वार करून हत्या केली.
सनी सरकारी कर्मचारी असल्याने हा विवाहच मुळी अवैध होता. त्यात तिने दबाव आणण्यासाठी गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामुळे संतापलेल्या सनीने हत्येचा कट रचला.
अशी केली हत्या
३० नोव्हेंबरला रात्री ८:३० वाजता घरकाम करणारी महिला गेल्यानंतर सनी नीलिमाच्या घरी दारूच्या बाटल्या घेऊन गेला. दोघांनीही महापान केले. त्यानंतर ती महिला झोपी गेली. ती गाढ झोपेत असताना सनीने तिच्या डोक्यावर दगडाने वार केले. तिला जाणीव होताच ती ओरडली तेव्हा त्याने तिच्या मानेवर चाकूने वार केला. हत्येनंतर सनी मागच्या दाराने बाहेर पडला.
लोकेशनवरून सुगावा
पोलिसांना पहिल्या दिवसापासून सनीवर संशय होता. म्हणूनच त्यांनी त्याचे मोबाइल लोकेशन आणि घराचे डीव्हीआर तपासण्यास सुरुवात केली. सनीचा मोबाइलदेखील दोन दिवस त्याच ठिकाणी असल्याचे निदर्शनास आले. हत्येच्या वेळीदेखील सनी महिलेच्या घरात होता, हे ट्रेस झाले. हा महत्त्वाचा सुगावा मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण आणि त्यांच्या पथकाने कारवाई केली.