सहा हजारांवर मतदारांची नावे दोन, तीन अन् चार वेळा ! मतदारयादीमधील दुबार नावांबाबत सर्वत्र गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:46 IST2025-11-04T18:41:08+5:302025-11-04T18:46:29+5:30
Amravati : नाव, लिंग, पत्ता, छायाचित्राची होणार तपासणी; हमीपत्रानंतरच मतदान

Over 6,000 voters' names appear twice, three times and four times! There is a stir everywhere regarding duplicate names in the voter list
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मतदारयादीमधील दुबार नावांबाबत सर्वत्र गदारोळ होत असताना जिल्ह्याच्या मतदारयादीतदेखील ६६८९ मतदारांच्या नावांची तब्बल १३,५१३ वेळा नोंद असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे ही नावे केवळ दुबारच नाही, काही नावे तिबार तर काही नावे तब्बल चारवेळा मतदारयादीत असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने २९ ऑक्टोबर रोजी मतदारयादीतील दुबार नावांबाबत उपाययोजनांसाठी मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत. त्यानुसार Mahavoterlist.in या प्रणालीवर दुबार रिपोर्ट टॅबनुसार ही दुबार नावे (**) अशी चिन्हांकित केली आहे. निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदारयादीत नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे तसेच त्यामध्ये दुरुस्ती करण्याचे करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोग तसेच या निवडणुकांसाठी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना नाहीत. मत्र मतदारयादी बिनचूक पाहिजे, यासाठी आयोगाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार लॉगिन आयडी व पासवर्डचा वापर करून दुबार रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर मतदारयादीत किती मतदारांची नावे एकापेक्षा अधिकवेळा आल्याची यादी तपशिलांसह निवडणूक विभागाला मिळते. यामध्ये दुबार नावे चिन्हांकित करण्यात आलेली आहे व या मतदारांचे नाव, लिंग, पत्ता व छायाचित्र याची आता प्राथमिक तपासणी केल्या जाणार असल्याची माहिती आहे.
हमीपत्र दिल्यास होणार मतदान
यादीतील दुबार मतदारांच्या प्राथमिक तपासणीत त्यांना कुठे मतदान करावयाचे आहे, याची माहिती घेतली जाणार आहे व त्यांनी प्रतिसाद न दिल्यास दुबार मतदार म्हणून यादीत तशी नोंद केल्या जाईल. सदर मतदार मतदानाला आल्यावर कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार, याबाबत अर्ज भरून घेतला जाईल व तेथे हमीपत्र दिल्यानंतरच त्याला मतदान करता येणार आहे.
यादीत अशी आली दुबार नावे?
मतदार नोंदणीचे वेली काही मतदारांनी ऑफलाइन नमुना अर्ज दिला, तर त्याच मतदाराने ऑनलाइनदेखील मतदार नोंदणी केली. शिवाय राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही या मतदाराची नमुना अर्ज भरून नोंदणी केल्याने यादीत दुपार, तिबार नावे आल्याची माहिती आहे. अशा मतदारांकडून हमीपत्र घेतल्यानंतर मतदानाची अनुमती दिल्या जाणार नाही.
मतदाराला द्यावे लागेल दोन प्रकारचे हमीपत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार यादीत या गण-गटात माझे नाव समाविष्ट आहे. त्या गण-गटातील या क्रमांकाच्या केंदावर मतदान करु इच्छीत असल्याने परवानगी द्यावी. या मतदान केंद्राशिवाय मी कोठेही मतदान करणार नाही. या नियमाचा भंग झाल्यास शिक्षेला पात्र असल्याची मला जाणीव आहे, असे शपथपत्र द्यावे लागेल.
मतदारयादीत असणारी दुबार नावे
- ६,५६६ मतदारांच्या नावांच्या दुबार नोंदीनुसार मतदार यादीत १३,१३२ नोंदी.
- १११ मतदारांच्या नावांच्या तिबार २ नोंदीनुसार मतदारयादीत ३३३ नोंदी आहेत.
- १२ मतदारांच्या नावांच्या चारवेळा नोंदीनुसार मतदारयादीत ४८ नोंदी आहेत.
"जिल्हा परिषद व पंचायत समिती दुबार निवडणुकीसाठी मतदारयादीतील नावांबाबत राज्य निवडणूक आयोगाने कार्यपद्धती विहीत केलेली आहे. या पद्धतीचा अवलंब केल्या जाणार आहे."
- ज्ञानेश घ्यार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)