आता राज्य महिला आयोगाची कार्यालये विभागीय स्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:17 IST2021-02-17T04:17:47+5:302021-02-17T04:17:47+5:30

परतवाडा : पीडित महिलांना तात्काळ मदत व समस्येचे निराकरण करण्याकरिता आता राज्य महिला आयोगाची कार्यालये विभागीय स्तरावर सुरू केली ...

Now the offices of the State Women's Commission are at the divisional level | आता राज्य महिला आयोगाची कार्यालये विभागीय स्तरावर

आता राज्य महिला आयोगाची कार्यालये विभागीय स्तरावर

परतवाडा : पीडित महिलांना तात्काळ मदत व समस्येचे निराकरण करण्याकरिता आता राज्य महिला आयोगाची कार्यालये विभागीय स्तरावर सुरू केली जात आहेत. विभागीय स्तरावरील या कार्यालयाचे कामकाज राज्य महिला आयोगातील सदस्य सचिव यांच्या समन्वयाने पार पडणार आहे. विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांच्या कार्यालयातून या कार्यालयाचे कामकाज हाताळले जाणार आहे. त्यानुसार अमरावती शहरातही हे कार्यालय उभारले जाणार आहे.

राज्य महिला आयोगाच्या विभागीय कार्यालयाकरिता अधिकारी, कर्मचारी यांच्या उपलब्धतेनंतर प्रत्येक विभागस्तरावर प्रस्तावित असलेल्या महिला व विकास भवनाच्या मुख्य इमारतीत ही कार्यालये स्वतंत्रपणे स्थलांतरित केली जाणार आहेत. आयोगाच्या विभागीय कार्यालयाद्वारे ´प्रस्तावित व नियोजित सुनावण्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. विभागीय कार्यालयास मासिक, तिमाही व वार्षिक अहवाल मुख्य कार्यालयास सादर करावा लागणार आहे. अति महत्त्वाच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी किंवा स्वाधिकारे नोंद घ्यावयाच्या तक्रारीबाबत राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही केली जाणार आहे. संबंधित विभागीय कार्यालयाच्या परिक्षेत्रातील समस्या घेऊन कार्यालयात आलेल्या महिलांच्या तक्ररींचे तात्काळ निवारण होण्याच्या दृष्टीने महिलेच्या इच्छेनुसार तज्ज्ञ समुपदेशकामार्फत विभागीय स्तरावरच समुपदेशन केले जाणार आहे. विभागीय कार्यालय व स्थानिक पोलीस ठाण्यात समन्वय राहणार आहे.

खर्च, त्रास वाचणार

विभागीय कार्यालयांमुळे आता पीडित महिलेला, मुंबईला जावे लागणार नाही. विभागीय पातळीवरच पीडित महिलांना आता आपली तक्रार मांडणे शक्य होणार आहे. पीडित महिलेला तातडीने मदत करण्यास विभागीय कार्यालयांची भूमिका उल्लेखनीय ठरणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या १० फेब्रुवारीच्या शासननिर्णयानुसार ही राज्य महिला आरोगाची विभागीय कार्यालये कार्यान्वित होत आहेत. यात अमरावती व नागपूरसह अन्य ठिकाणी विभागीय पातळीवर ही कार्यालये देण्यात आली आहेत.

Web Title: Now the offices of the State Women's Commission are at the divisional level