चार महिन्यांपासून मानधन नाही, आता कंत्राटींनी काढली किडनी विकायला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 13:37 IST2026-01-15T13:35:09+5:302026-01-15T13:37:54+5:30
Amravati : अमरावती येथील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांची आपबीती

No honorarium for four months, now contractors are selling their kidneys
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद पाणीपुरवठा स्वच्छता विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. मानधनासाठी अनेकदा आंदोलने केल्यानंतरही शासनाकडून दखल घेतली गेली नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी किडनी विकण्याचा पवित्रा घेतला आहे.
ग्रामीण जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनमध्ये गेल्या १५ ते २० वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे गेल्या ४ महिन्यांपासून वेतनाविना त्यामुळे त्रस्त राहण्याची वेळ ओढवली आहे. कर्मचाऱ्यांनी किडनी घेता का कोणी किडनी... असा पवित्रा घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी हा मुद्दा जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यापासून ते थेट या विभागाच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचविला. परंतु याची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याची खंत या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पाणी व स्वच्छता मिशन या विभागात ५० हून अधिक कर्मचारी आहेत. यापैकी ४२ कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या चार महिन्यांपासून झाले नाही. आज ना उद्या वेतन मिळेल, या अपेक्षेवर त्यांनी आपली नियमित कामे सुरूच ठेवली आहेत. परंतु चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही वेतन न झाल्याने अलीकडे त्यांना आर्थिक चणचणीला तोंड द्यावे लागत आहे.
उदरनिर्वाह झाला कठीण
- गेल्या चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने साधारणतः ६० लाख रुपये थकीत आहेत.
- घरी लागणारा किराणा, कपडे आदी त्यांनी उधारीवर प्राप्त केले, परंतु मुलांच्या शाळांचे शुल्क, वृद्धांचे औषधोपचार आदी बाबींसाठी मात्र त्यांची मोठी कसरत होत आहे.
- या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ३ मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी शासनाशी चर्चा करून हा मुद्दा सोडवावा, अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
"कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनाबाबत मी संबंधित विभागाच्या प्रधान सचिवांना गेल्या आठवड्यातच पत्र पाठविले. परंतु अद्याप काहीही तोडगा निघाला नाही. बुधवारी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला असून, स्मरणपत्रही देत आहे. याबाबत लवकरच तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे."
- संजीता महापात्र, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद