मेळघाटात आरोग्य अज्ञानाने घेतला नवजाताचा बळी; चुकीच्या पद्धतीने कापली नाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 14:23 IST2026-03-07T14:22:41+5:302026-03-07T14:23:34+5:30
Amravati : मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील भंडोरा येथे एका २२ वर्षीय मातेची पहिलीच प्रसूती घरी करण्यात आली. मात्र आरोग्यविषयक अज्ञानामुळे जन्मानंतर काही तासांतच नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Newborn dies due to health ignorance in Melghat; umbilical cord cut incorrectly
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा (अमरावती) :मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील भंडोरा येथे एका २२ वर्षीय मातेची पहिलीच प्रसूती घरी करण्यात आली. मात्र आरोग्यविषयक अज्ञानामुळे जन्मानंतर काही तासांतच नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आरोग्य विभागाकडून मेळघाटात आरोग्य यंत्रणा 'अलर्ट' असल्याचा दावा केला जात असताना ही घटना घडल्याने त्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भंडोरा येथील रेशमा नरेश भुसुम (२२) ही विवाहिता गुरुवारी (दि. ५) प्रसूत झाली. आरोग्य केंद्रात न नेता घरीच तिची प्रसूती करण्यात आली. दाईवजा महिलेने बाळाची नाळ टोकावर (खोलगट) कापली; परंतु तिला गाठ बांधली नाही. इतकेच नव्हे तर, बाळ जन्मल्यानंतर काही वेळातच त्याला अंघोळ घालण्यात आली. या गंभीर चुकांमुळे बाळाची प्रकृती खालावली. नाळेची गाठ न बांधणे आणि जन्मल्यानंतर काही वेळातच त्याला अंघोळ घालणे बाळाच्या जिवावर बेतले.
यंत्रणा ढिम्म; आशा वर्करवर रोष
बाळाची प्रकृती बिघडल्यानंतर आशा वर्कर व काही गावकऱ्यांनी महत्प्रयासाने रात्री ८ वाजता मातेसह बाळाला चुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. रामदेव वर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाळाला 'वॉर्मपेटी'मध्ये ठेवले.
मात्र, बाळाची प्रकृती आणि मातेचा रक्तस्राव पाहता त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला; परंतु नातेवाइकांनी प्रतिसाद दिला नाही आणि शुक्रवारी पहाटे बाळाचा मृत्यू झाला. पहिल्यांदा गर्भवती असताना काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राने या मातेची दखल का घेतली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
परिवाराचा आशावर रोष
बाळ दगावल्याने संतप्त नातेवाइकांनी आशा वर्करवर रोष व्यक्त केला. त्यांना काही काळ डांबून ठेवल्याची चर्चा परिसरात होती. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
बाळ जिवंत; अफवांचे पेव
बाळाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट असतानाही गावात आल्यावर बाळ पुन्हा जिवंत झाल्याची अफवा परिसरात पसरली होती. मात्र, ही चर्चा पूर्णतः निरर्थक ठरली.
"बाळाची नाळ घरीच अत्यंत चुकीच्या पद्धतीने कापली गेली होती आणि त्याला गाठही बांधली नव्हती. त्यातच जन्मानंतर लगेच अंघोळ घातल्याने संसर्ग वाढला. आम्ही जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाइकांनी नकार दिला."
- डॉ. रामदेव वर्मा, ग्रामीण रुग्णालय, चुरणी, ता. चिखलदरा