"राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण बाबरी पडली तेव्हा...", शरद पवारांचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 18:15 IST2023-12-27T18:12:41+5:302023-12-27T18:15:03+5:30
Sharad Pawar On Ram Mandir: नवीन वर्षात २२ जानेवारीला अयोध्येत रामलला भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत.

"राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण बाबरी पडली तेव्हा...", शरद पवारांचा भाजपाला टोला
Ram Mandir Ayodhya | अमरावती: नवीन वर्षात २२ जानेवारीला अयोध्येत रामलला भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. यासाठी सर्वत्र आनंदाचं वातावरण असून मंदीर ट्रस्टने विविध क्षेत्रातील नामांकित मंडळीला आमंत्रण दिले आहे. प्रभू श्रीरामाची मंदिरात प्रतिष्ठापना होण्यापूर्वी राजकारणही तापू लागलं आहे. सत्ताधारी भाजपा या कार्यक्रमाचे श्रेय घेत आहे, अशी टीका विरोधक करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपाला लक्ष्य केलं. अयोध्येत राम मंदिर झालं याचा आनंद असल्याची भावनाही पवारांनी व्यक्त केली. ते अमरावतीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
"राम मंदिर झाल्याचा आनंद आहे. पण, बाबरी पडली तेव्हा तिथे केवळ एकच पक्ष होता", अशा शब्दांत पवारांनी भाजपाला टोला लगावला. तसेच तीन राज्यातील राज्याचा निकाल अपेक्षेमाणं लागला नाही. मात्र, 'इंडिया' आघाडीत लढलो असतो तर निकाल वेगळा लागू शकला असता. आगामी काळात देखील एकत्र लढल्यास यश मिळेल. प्रकाश आंबेडकरांनी 'इंडिया' आघाडीसोबत यावं ही सर्वांचीच इच्छा आहे. यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. सत्ताधारी भाजपा राम मंदिराच्या नावावरून राजकारण करत आहे की व्यवसाय हे मला माहित नाही, असेही शरद पवारांनी सांगितले.
दरम्यान, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं. राजस्थानच्या जनतेनं आपली परंपरा कायम राखत सत्ताबदल केला अन् भाजपाच्या हाती सत्तेच्या चाव्या सोपवल्या. पण, छत्तीसगडच्या निकालानं राजकीय पंडितानांही धक्का बसला. भूपेश बघेल यांची प्रचंड लोकप्रियता असताना देखील काँग्रेसचा इथं पराभव झाला. लक्षणीय बाब म्हणजे या राज्यांमध्ये 'इंडिया' आघाडीचं गणित फसलं. मध्य प्रदेशात समाजवादी पक्षानं काँग्रेस विरोधात उमेदवार दिले होते. याचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसला. त्यामुळं आगामी काळात प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी 'इंडिया' आघाडीचा भाग होणार का हे पाहण्याजोगे असेल.