बनावट नोटा प्रकरणात नागपूर, धुळे, मालेगाव कनेक्शन ; सूत्रधारासह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:48 IST2025-11-25T13:47:02+5:302025-11-25T13:48:26+5:30
Amravati : मध्य प्रदेशातील भोपाळ येथील गोकुलधाम सोसायटीमध्ये चालणाऱ्या बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी खंडवा येथील मुख्य सूत्रधारासह तीन फरार आरोपींना केली.

Nagpur, Dhule, Malegaon connection in fake currency case; Three arrested including mastermind
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी (अमरावती): मध्य प्रदेशातील भोपाळ येथील गोकुलधाम सोसायटीमध्ये चालणाऱ्या बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी खंडवा येथील मुख्य सूत्रधारासह तीन फरार आरोपींना केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक हा जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक असून, त्याचा मूळ संबंध अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याशी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
खंडवा पोलिस अधीक्षक मनोज कुमार राय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) रविवारी (२३ नोव्हेंबर) ही कारवाई केली. या पार्श्वभूमीवर बनावट नोटांचे नेटवर्क राज्यातील अनेक भागांत पसरले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्य सूत्रधार डॉ. प्रतीक सुरेश नवलाखे (ब-हाणपूर), गोपाल ऊर्फ राहुल मांगीलाल पनवार (३५, हरदा), प्रभारी मुख्याध्यापक दिनेश दीपक गोरे (४३, रा. साईनगर, धारणी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
अटक झालेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान जेलमध्ये झालेल्या ओळखीमुळेच या गोरखधंद्यात सहभागी झाल्याचे सांगितले. भोपाळ येथे नकली नोटा छापल्या जात होत्या. होशंगाबाद रस्त्यावर ते फूड अँड ट्रॅव्हल्स नामक कंपनी चालवत होते. त्याच्याआड हा गोरखधंदा सुरू होता.
४० लाखांच्या नोटा छापल्या
प्राथमिक तपासात आतापर्यंत ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा छापल्याचे आरोपीने सांगितले असून, तपासादरम्यान खरी रक्कम पुढे येणार आहे. पूर्वी ५० रुपयांच्या नोटा छापण्याचा प्रयत्न केला होता.
नागपूर, धुळे, मालेगाव, जळगाव, चंद्रपूर, मूर्तिजापूर, धारणी
मुख्य आरोपी प्रतीक नवलाखे हा मौलाना याच्यामार्फत पार्त्या शोधून त्यांना नोटा देण्याचे काम करत होता. राज्यातील नागपूर, धुळे, मालेगाव, जळगाव, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर व धारणी येथे बनावट नोटा पाठवित असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
नवलाखे जळगाव भुसावळमध्ये आरोपी
मुख्य आरोपी प्रतीक नवलाखे याला नकली नोटा प्रकरणात जळगाव भुसावळमध्ये पकडण्यात आले होते.
तपासणीदरम्यान त्याच्याजवळून पाचशे रुपयांच्या १३ बनावट नोटा, सात मोबाइल, एक लॅपटॉप, ड्रायर मशीन, ३५ एटीएम कार्ड जप्त केली होती. गोपाल पनवारकडून पाचशेच्या सहा नकली नोटा, तर धारणी जिल्हा परिषदेचा शिक्षक दिनेश दीपक गोरे याच्याजवळून १७ नकली नोटा असा एकूण १९ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
मुख्य आरोपी प्रतीक नवलाखेची बऱ्हाणपूर व त्याच्याच गावातील नईमसोबत ओळख झाली. सोबत अमरावतीच्या वसीमसोबत सुद्धा ओळख झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या वसीमच्या माध्यमातूनच जिल्हा परिषदेचा शिक्षक दिनेश गोरे याची ओळख झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषद सीईओ यांनी अहवाल मागितला
देशद्रोहाचा गुन्हा करणाऱ्या शिक्षकाला बनावट नोटा प्रकरणात अटक होताच, जिल्हा परिषदेच्या सीईओ यांनी तत्काळ धारणी शिक्षण विभागाकडून अहवाल मागितला असून, स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.
"बैरागड केंद्रांतर्गत पडीदम जिल्हा परिषद शाळेवर दिनेश गोरे हा शिक्षक असून, प्रभारी मुख्याध्यापक आहे. सदर प्रकरणाची माहिती मिळताच चौकशी सुरू केली आहे. तसा अहवाल वरिष्ठांना पाठविला जाणार आहे."
- गुणवंत वरघट, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, धारणी
"अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील शिक्षक दिनेश गोरे या आरोपीस बनावट नोटा प्रकरणात त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. धारणी, नागपूर, धुळे, मूर्तिजापूर, जळगाव, मालेगाव, अशा विविध ठिकाणी ही टोळी बनावट नोटांचा कारभार करीत असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे."
-महेंद्र तारणेकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, खंडवा, मध्यप्रदेश