अमरावती : महापालिकेची ऑनलाईन आमसभा शुक्रवारी होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू असल्याने या सभेवरदेखील सावट राहणार आहे. त्यामुळे या आमसभेतदेखील धोरणात्मक निर्णय टाळले जाणार असल्याची माहिती आहे.
मागील महिन्यात विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता जारी असल्याने आमसभा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आता १८ डिसेंबरला आमसभा होत आहे. यावेळीदेखील जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रीया सुरू आहे. आयोगाच्या नियमानुसार जिल्ह्यातील ५० टक्क्यांवर ग्रामपंचायतींच्या निवडणुका ज्या जिल्ह्यात आहेत, त्या पूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहणार आहे. त्यामुळे या आचारसंहितेचे पडसाद महापालिकेच्या आमसभेत उमटू शकतात. आमसभा झाल्यास प्रलंबित विषयात बडनेरा येथील वौयक्तीक शौचालय घोटाळ्याचा अहवाल, भूखंड हस्तांतरण प्रकरण यासह उपायुक्त निवडीचे प्रकरणासह अन्य विषय तापण्याची शक्यता आहे.