'आव्हाडांनी देशाची माफी मागावी; विरोधी पक्षात बसणं त्यांना पचत नाही'; नवनीत राणांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 17:02 IST2024-01-04T17:00:30+5:302024-01-04T17:02:07+5:30
जितेंद्र आव्हाड यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.

'आव्हाडांनी देशाची माफी मागावी; विरोधी पक्षात बसणं त्यांना पचत नाही'; नवनीत राणांची टीका
प्रभू श्रीराम हे बहुजनांचे होते, तसेच ते मांसाहारी होते, असं विधान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानावरुन राज्यासह देशात वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाने देखील जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचदरम्यान अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे.
आज अमरावतीत नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षात बसणं आवडत नाही. त्यांना ते पचत नाही. मानसिक रुग्णांवर आग्र्याला उपचार होतो, त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना तेथे जायची गरज आहे. वेळ पडली तर त्यांना आमदार रवी राणा त्यांना तिकीट पाठवतील, अशी टीकाही नवनीत राणा यांनी केली आहे.
दरम्यान, प्रभू राम जिथून गेले त्या गावचा माणूस मी आहे. त्यामुळे मला राम कुणी सांगू नये. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. मी पुरंदरेंच्या विरोधात बोललो तेव्हा मला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी माफी मागायला सांगितली होती. पक्ष कुणाची सामाजिक भूमिका ठरवू शकत नाही असं पवारांनी मला स्पष्ट सांगितले होते. मी एकटा लढतो. रोहित पवारांना मी फार महत्त्व देत नाही. अबुधाबीत जाऊन बोलणे सोपे आहे. कुठलेही भाष्य असते कार्यकर्त्यांनी पटतं ते घ्यावे आणि बाकी सोडून द्यावे. वाल्मिकी रामायणात जे लिहिलंय ते मी बोललो. लोकभावनेचा आदर करतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त विधानावर दिले आहे.