कर्मचाऱ्याला आरोपी ठरविणाऱ्या फाईलींना फुटले पाय; वैज्ञानिक प्रयोगशाळेतील प्रकार
By प्रदीप भाकरे | Updated: February 23, 2023 16:55 IST2023-02-23T16:53:33+5:302023-02-23T16:55:22+5:30
कर्मचाऱ्यांवरच संशय, चोरीचा गुन्हा दाखल

कर्मचाऱ्याला आरोपी ठरविणाऱ्या फाईलींना फुटले पाय; वैज्ञानिक प्रयोगशाळेतील प्रकार
अमरावती : एका कार्यालयीन कर्मचाऱ्याला आरोपी ठरविणाऱ्या व त्याचे सव्हिस बुक खराब करू शकणाऱ्या दोन फायलींना चक्क पाय फुटले. येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील सहायक अधीक्षकांच्या दालनातून १७ जानेवारी ते १० जून २०२२ या कालावधीत त्या दोन फाईल चोरीला गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली. याप्रकरणी प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक रविंद्र जगताप (५७) यांनी २२ फेब्रुवारी रोजी फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात फाईलचोरांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, त्या कार्यालयात भांडार नोकर असलेल्या दि.ना.तांदळे यांच्याबाबत तत्कालिन उपसंचालकांनी वेळोवेळी केेलेला पत्रव्यवहार व तांदळे यांच्याविरूध्द दाखल कौटुंबिक छळ व प्राणघातक हल्ल्याची अशा दोन फाईल तेथीलच सहायक अधीक्षक गडकरी यांच्या दालनात होत्या. दरम्यान ३१ मे २०२२ रोजी गडकरी यांचा मृत्यू झाला. पुढे तत्कालिन उपसंचालकांनी प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा गाठत विद्यमान उपसंचालक जगताप यांना त्या दोन फाईलबाबत विचारणा केली. त्यावेळी त्या दोन फाईलींचा शोध घेण्यात आला. त्याबाबत मुंबईच्या वरिष्ट कार्यालयाशी पत्रव्यवहार करून चौकशी देखील करण्यात आली. चौकशी अहवालअंती या फाईल चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पत्र जगताप यांना मिळाले. त्यावरून तक्रार दाखल करण्यात आली. प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत काम करणाऱ्या कोणत्यातरी कार्यालयीन कर्मचाऱ्याने त्या दोन फाईली चोरून नेल्या आहेत, असे जगताप यांनी म्हटले आहे.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या उपसंचालकांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान संबंधितांचे बयाण नोंदविले जातील. सीसीटिव्ही फुटेजदेखील तपासण्यात येईल.
- गोरखनाथ जाधव, ठाणेदार, फ्रेजरपुरा