मेळघाटच्या हत्तीघाट-बुरडघाट परिसरात भीषण आग; वनविभागाचे वणवा विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:10 IST2026-03-18T13:09:10+5:302026-03-18T13:10:37+5:30
Amravati : मेळघाटव्याप्त हत्तीघाट आणि बुरडघाट परिसरातील वनक्षेत्रात सोमवारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच खोज संस्थेचे अॅड. बंड्या साने यांनी वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधला, मात्र तेथून प्रतिसाद मिळाला नाही.

Massive fire breaks out in Hattighat-Burdghat area of Melghat; Forest Department's efforts to extinguish the fire
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाटव्याप्त हत्तीघाट आणि बुरडघाट परिसरातील वनक्षेत्रात सोमवारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच खोज संस्थेचे अॅड. बंड्या साने यांनी वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधला, मात्र तेथून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर साने यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर यंत्रणा जागी झाली आणि रात्री उशिरापर्यंत वणवा विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
सोमवारी दुपारच्या सुमारास हत्तीघाट आणि बुरडघाट परिसरातील डोंगरावरून धुराचे लोट दिसू लागले. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. अॅड. बंड्या साने यांनी या भीषण आगीबाबत वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर वारंवार कॉल केला. मात्र, तिकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर साने यांच्या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आणि क्षेत्रीय कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
प्रशासकीय हालचालींना वेग
वनाधिकारी जयोती बॅनर्जी आणि विभागीय वन अधिकारी यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून परिस्थितीचा आढावा घेतला. हे क्षेत्र प्रादेशिक वनविभागाच्या अखत्यारीत येते. मात्र, वनसंपत्तीचे नुकसान टाळण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी रात्रीच घटनास्थळी खाना झाल्याचे सांगण्यात आले. जंगलात लागलेली आग महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात पसरत असल्याने दोन्ही राज्यांच्या वनविभागाकडून संयुक्तपणे उपाययोजना केल्या जात आहेत.
"हत्तीघाट, बुरडघाट परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलात आग दिसून आली. टोल फ्रीवर प्रतिसद मिळाला नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांनी कर्मचारी रवाना करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले."
- अॅड. बंड्या साने, खोज संस्था, परतवाडा