मालखेड पर्यटनस्थळ बनले वाहनतळ
By Admin | Updated: July 6, 2016 00:18 IST2016-07-06T00:18:47+5:302016-07-06T00:18:47+5:30
नजीकच्या मालखेड येथील कृष्णाजी सागर पर्यटन स्थळाला घाणीच्या साम्राज्याने वेढले आहे.

मालखेड पर्यटनस्थळ बनले वाहनतळ
बागेत घाणीचे साम्राज्य : केवळ दोन सफाई कामगार, सिंचन विभागाचे दुर्लक्ष
मनीष कहाते अमरावती
नजीकच्या मालखेड येथील कृष्णाजी सागर पर्यटन स्थळाला घाणीच्या साम्राज्याने वेढले आहे. केवळ दोन महिला सफाई कामगार येथे कार्यरत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे निदर्शनास येत आहे. बगिच्यामध्ये अनेक वाहने उभी आहेत. त्यामुळे हा बगीचा आहे की वाहनतळ, असा प्रश्न पर्यटकांना पडला आहे.
विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून दररोज शेकडो पर्यटक येथे येतात. परंतु त्यांना कोणत्याही सोयीसुविधा कंत्राटदारामार्फत पुरविल्या जात नाहीत. सिंचन विभागाने ११ महिन्यांकरिता सुमारे ३० लाख रुपयांमध्ये कृष्णाजी सागर पर्यटन स्थळ कंत्राटदाराला चालविण्याकरिता देण्यात आला. परंतु बगिच्यामध्ये पाण्याचे ठिकठिकाणी डबके साचले आहेत. स्विमिंग पुलाच्या पाण्यात किडेमृतावस्थेत आढळून येत आहेत. पाणी अस्वच्छ आहे.
पाण्याच्या बाटल्या ठिकठिकाणी पडल्या आहेत. बगिच्यातील झाडे नियोजनाअभावी वाळलेली आहेत. डब्बे पार्टीकरिता आलेल्या पर्यटकांकरिता कचरा कुंडीची व्यवस्था नाही. कागदाचे तुकडे गवतावर दिसत आहे. महिलाकरिता कपडे बदलविण्यासाठी एकच छोटीशी रुम आहे. त्यातही मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. पायऱ्याचे दगड पूर्ण उखडलेले आहेत. गवतही सुकलेले आहेत. स्विमिंग पुलावरचा धबधबामधील पाणी बाजूला पडते. त्यामुळे अनेक पर्यटकांचे पाय घसरून दुखापत झाल्याची घटना येथे घडल्या आहेत.
कृष्णाजी सागर प्रकल्प सन १९७४ साली पूर्ण झाला. १० वर्षांपूर्वी पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले. तेव्हा पर्यटन स्थळाची संपूर्ण मालकी सिंचन विभागाची होती. परंतु दरवर्षी तोटा होत होता. त्यामुळे एका खासगी कंत्राटदाराला सदर पर्यटन स्थळ चालविण्याकरिता दिले. परंतु चांगल्या सोयीसुविधा निर्माण होऊ शकल्या नाही. त्यामुळे भविष्यात सुधारणा न झाल्यास पर्यटन स्थळाचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही.