अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण ११ ते १४ मार्च दरम्यान काढण्यात आले आहे. मात्र, शासनस्तरावर आरक्षण रद्द करण्यात येऊन निवडणूक पश्चात काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याने इच्छुक हिरमुसले आहेत.
सरपंचपदासाठी घोडेबाजार थांबावा व खोटी जात प्रकरणे दाखवून निवडणूक लढविण्यात येत असल्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आरक्षण असलेल्या व्यक्तीला पद न मिळता त्यांना वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे यापूर्वी काढण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यात आले व आता जानेवारी महिन्यात नव्याने सरपंचपदासाठी आरक्षण काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणुकीची अधिसुचना काढण्यात आलेली आहे. आता २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्जाला सुरुवात होणार आहे व ३० ही अंतिम मुदत आहे. कोरोना संसर्गाचे नियम पाळून ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.