महत्त्वाचा ठरतोय ‘जात’ फॅक्टर!

By Admin | Updated: October 12, 2015 00:44 IST2015-10-12T00:44:37+5:302015-10-12T00:44:37+5:30

७ नोव्हेंबरला होणाऱ्या शिक्षक बँकेच्या निवडणुकीत जाती-पातीचे राजकारण शिरले आहे.

The important thing is the 'cast' factor! | महत्त्वाचा ठरतोय ‘जात’ फॅक्टर!

महत्त्वाचा ठरतोय ‘जात’ फॅक्टर!


अमरावती : ७ नोव्हेंबरला होणाऱ्या शिक्षक बँकेच्या निवडणुकीत जाती-पातीचे राजकारण शिरले आहे. केवळ शिक्षक किंवा जि.प. कर्मचारी म्हणून नव्हे, तर जातीच्या नावावर प्रचाराचे घोडे दामटले जातेय. विरोधी पॅनेलने आपल्या जातीला कसे डावलले, विशिष्ट जातीच्या उमेदवारांना कसे प्राधान्य दिले, हे पटवून दिले जात आहे. शिक्षक मतदारसंघाच्या तुलनेत जि.प. कर्मचारी संवर्ग मतदारसंघात ‘जात’ दाखवून अवलक्षण होत आहे.
२१ संचालकांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्हाभरातील १० हजारांवर शिक्षक आणि २ हजारांपेक्षा अधिक जि.प. कर्मचारी सरसावले आहेत. यात अनुसूचित जाती-जमातींसह विविध संवर्गासाठी जागा राखीव आहेत. मात्र, त्याचवेळी २१ पैकी एकाही जागेवर आपल्या उमेदवाराला प्राधान्य दिले नाही, असा प्रचार करून प्रतिस्पर्धी पॅनेलच्या उमेदवारांची विकेट घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि अकोला असे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक यंदा प्रथमच विभागीय स्तरावर होत असल्याने ही लढत रंगतदार होणार आहे. यंदा प्रथमच समता, प्रगती, युवाशक्ती आणि परिवर्तन पॅनेलमध्ये काट्याच्या लढतीची चिन्हे आहेत. २१ संचालकांसाठी १७२ पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक आता ‘जाती’वर उतरल्याचे दिसून येते. तालुकास्तरावर प्रचार करणाऱ्या उमेदवारांना विभागस्तरावर प्रचार करताना प्रचाराचे वेगवेगळे मुद्दे शोधावे लागत आहेत. बँकेच्या विकासाबाबत बोलताना जातीबद्दलही सांगितले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा परिषद कर्मचारी संवर्ग मतदारसंघात हा प्रकार होत आहे.
राजकारणातील जाती-पातीचे राजकारण यंदा प्रथमच सहकार क्षेत्रातील निवडणुकीतही पहावयास मिळत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने शिक्षक नेते, उमेदवार परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असून राजकारण्यांनाही लाजवेल, असा शिक्षकांचा प्रचाराचा थाट वाढलेला दिसत आहे. शिक्षकांसोबतच जिल्हा परिषदेचे कर्मचारी प्रचारात उतरले आहेत. उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत कागदोपत्रीच दिसणाऱ्या अनेक संघटना पॅनेलच्या प्रसिध्दी पत्रकावर येऊन स्वत:चा भाव वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The important thing is the 'cast' factor!