"तुझा फ्लॅट माझ्या नावाने कर नाही तर.. " प्रेयसीवर बंदूक रोखून, प्रियकराने दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:26 IST2025-11-22T17:25:37+5:302025-11-22T17:26:42+5:30
महिलेची आर्थिक, शारीरिक फसवणूक : गाडगेनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल

"If you don't register your flat in my name...", the lover threatened his girlfriend by pointing a gun at her.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तुझा फ्लॅट माझ्या नावाने कर, अन्यथा तुला व तुझ्या मुलीला गोळी मारून, तुमच्या दोघींचा मर्डर करेन, अशी धमकी एका ५० वर्षीय माथेफिरूने प्रेयसीला दिली. आरोपीने तिच्यावर बलात्कारदेखील केला. सन २०१९ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान ती लैंगिक व आर्थिक फसवणुकीची मालिका घडली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी मंगेश सदाशिव खेडकर (वय ५०, रा. मनसावली अपार्टमेंट, कांतानगर, कमिशनर ऑफिसजवळ, अमरावती) याच्याविरुद्ध २० नोव्हेंबर रोजी रात्री बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
एफआयआरनुसार, कॅम्प भागात राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेचे आरोपी मंगेश खेडकर याने सन २०१९ पासून लग्नाचे आमिष देत शारीरिक शोषण केले. तो माथेफिरू एवढ्यावरच थांबला नाही, त्याने त्याच्या मोबाईलमध्ये फिर्यादी महिलेचे अश्लील व्हिडिओदेखील बनवले. ते अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीदेखील त्याने दिली. दरम्यानच्या काळात पीडितेने त्याला विरोध केला असता, तो एक दिवस बंदूक घेऊन तिच्या घरी पोहोचला. तथा तिला जीवाने मारण्याची धमकी दिली. 'तुझा फ्लॅट माझ्या नावाने कर, अन्यथा तुला व तुझ्या मुलीला गोळी मारून, तुमचा मर्डर करेन', अशी गर्भित धमकी त्याने दिली. गेल्या पाच वर्षांपासून तो पीडितेला त्रास देत होता. अखेर पीडितेने २० नोव्हेंबर रोजी गाडगेनगर पोलिस स्टेशन गाठून आरोपी मंगेश खेडकर याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. आरोपीने आजपर्यंत आपली मानसिक, आर्थिक व शारीरिक फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गाडगेनगर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे हे करीत आहेत.