पत्नीने पोटावर लाथा हाणल्याने पतीचा मृत्यू, चार महिन्यांनी गुन्हा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 11:30 IST2023-09-11T11:29:27+5:302023-09-11T11:30:40+5:30

मुलाची तक्रार : आई म्हणाली, बाबा ट्रॅक्टरवरून पडल्याचे सांग

Husband dies after wife kicks him in the stomach, crime filed after four months | पत्नीने पोटावर लाथा हाणल्याने पतीचा मृत्यू, चार महिन्यांनी गुन्हा उघड

पत्नीने पोटावर लाथा हाणल्याने पतीचा मृत्यू, चार महिन्यांनी गुन्हा उघड

चिखलदरा (अमरावती) : शेतात काम करताना ट्रॅक्टरवरून पडल्याने पोटात दुखापत झाली, असा बनाव उपचारासाठी दाखल इसमाच्या पत्नीने केला. पोलिसांच्या चौकशीत ट्रॅक्टर चार महिन्यांपासून बंद असल्याचे पुढे आले. पत्नीने भांडणात पतीच्या पोटावर लाथा मारल्याचा खरा प्रकार उघड झाला. नागपूर येथे उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुलाच्या फिर्यादीवरून पत्नीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

चिखलदरा तालुक्यातील टेंब्रुसोंडा येथे हा प्रकार घडला. प्रभुदास वऱ्हाडे (५२, रा. टेम्बुसोंडा) असे मृताचे नाव आहे. आरोपी पत्नी लक्ष्मी (४५) विरुद्ध मुलगा दीपक (२८) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी १० सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, आरोपी लक्ष्मी व मृत प्रभुदास यांचे घरगुती कारणावरून नेहमी भांडण होत होते. यातूनच १४ मे रोजी तिने प्रभुदासच्या पोटावर जोरजोराने लाथा मारल्या. त्यांच्या पोटात प्रचंड वेदना होत असल्याने दीपकने रुग्णालयात दाखल केले. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १४ मे रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस चौकशीत घटना उघड

तुझे बाबा ट्रॅक्टर चालविताना खाली पडल्याचे सांग, असा सल्ला लक्ष्मीने दिल्याने दीपकने पोलिसांना तसे बयाण त्यावेळी दिले होते. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा पोटावर लाथा मारल्याचे पुढे आले. पुढील तपासात ठाणेदार आनंद पिदुरकर, पीएसआय सुरेश राठोड, जमादार प्रभाकर चव्हाण व सहकारी करीत आहेत.

Web Title: Husband dies after wife kicks him in the stomach, crime filed after four months