How did Supriya covered in a covered well? | झाकलेल्या विहिरीत सुप्रिया पडली कशी?
झाकलेल्या विहिरीत सुप्रिया पडली कशी?

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ख्रिस्त कॉलनीत भाड्याने राहायला गेलेल्या काबरा कुटुंबीयांची सहा वर्षीय सुप्रिया हिचा घराच्या आवारातीलच विहिरीत मृतदेह आढळला. ती विहीर हिरव्या जाळीने संपूर्ण झाकलेली होती. दीड फूट जागाच केवळ मोकळी होती तसेच विहिरीच्या गोलाकारावर कुंड्या ठेवल्या होत्या. इतके अडचणीचे ठिकाण असताना सुप्रिया विहिरीत पडलीच कशी, या दिशेने पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.
चांदूरबाजार येथील व्ही.आर. काबरा शाळेच्या अध्यक्षाची सुप्रिया ही मुलगी होती. सुप्रियाच्या वडिलांचे आठ महिन्यांपूर्वी निधन झाले. मतिमंद सुप्रियाला ख्रिस्त कॉलनी स्थित आशादीप मतिमंद विद्यालयात शिक्षणासाठी दाखल करण्यात आले. चांदूर बाजारहून तिला दररोज शाळेत ने-आण केले जात होते. ७ जुलै रोजी सुप्रियाची आई दोन्ही मुलींना घेऊन ख्रिस्त कॉलनीतील चंद्रमोहन क्षीरसागर यांच्याकडे भाड्याने राहायला आल्या. यादरम्यान दुपारच्या सुमारास ती बेपत्ता झाली. कुटुंबीयांसह गाडगेनगर पोलिसांनी तिचा शोध घेतला. गाडगेनगर पोलिसांनी सोमवारी पुन्हा क्षीरसागर यांच्या घरी जाऊन विचारपूस केली. त्यांच्या घराच्या आवारात असणाऱ्या विहिरीतसुद्धा पाहण्यात आले. मंगळवारी विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे पाहून काही जणांनी डोकावून पाहिले असता, सुप्रियाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या माहितीवरून गाडगेनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद चव्हाण यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यावेळी संपूर्ण विहिरीवर हिरव्या जाळीचे आवरण व त्याभोवती कुंड्या लावलेल्या होत्या. केवळ समोरील बाजूने दीड फूट इतकी जाळी उघडी असल्याचे आढळले. त्यातूनच सुप्रिया आत पडली असावी, असा कयास लावण्यात आला. मात्र, आधीच विहिरीवर हिरव्या नेटचे आवरण, कुंड्या असताना सुप्रिया आत पडली कशी? कोणत्याही कुंड्यांना धक्का लागलेला नव्हता. हिरवी नेटसुद्धा ‘जैसे थे’ होती. त्यातच २० ते २५ फूट खोल या विहिरीच्या आतील ओबडधोबड दगड आहेत. विशेष म्हणजे, शवविच्छेदन अहवालात सुप्रियाच्या शरीरावर एकही जखम नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सुप्रिया विहिरीत पडली कशी, या दिशेने पोलीस तपास करीत आहे. सुप्रियाच्या मृत्यूबाबत ख्रिस्त कॉलनीसह शहरात विविध चर्चा सुरु झाली आहे.

पोलीस तपासाची दिशा : शवविच्छेदन अहवालानुसार पाण्यात बुडून मृत्यू
ख्रिस्त कॉलनीतील घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यावेळी विहिरीवर ग्रीन नेट व कुंड्या होत्या. केवळ एक ते दीड फूट इतकीच जागा मोकळी होती. तिच्या शरीरावर एकही जखम आढळली नाही. शवविच्छेदन अहवालात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे.
- विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक

पाण्यात बूडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट होत आहे. ती विहिरीत पडली कशी, या दिशेनेही तपास सुरू आहे. मृत सुप्रियाच्या कुटुंबीयांचे बयाण नोंदविण्यात येईल. याबाबत चौकशी सुरू आहे.
- राजश्री चंदापुरे
पोलीस उपनिरीक्षक, गाडगेनगर.

सुप्रिया पडल्याचा आवाज नाही
रविवारी दुपारच्या सुमारास सुप्रियाची आई घरात साहित्याची आवरासावर करीत होती. यादरम्यान सुप्रिया बेपत्ता झाली. त्याच वेळी ती विहिरीत पडली असावी. मात्र, दुपार आणि त्यात रविवार असल्याने वर्दळ वाहनांची फारशी नसताना सुप्रिया विहिरीत पडल्यावर कुणालाच आवाज कसा आला नाही, विहिरीवर आवरण असताना सुप्रिया त्यात पडली कशी, ही बाब तेथील रहिवाशांना भेडसावत आहे.


Web Title: How did Supriya covered in a covered well?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.