प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या 'शिवशाही'ला आग, बस जळून खाक; अमरावतीमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 19:55 IST2025-03-22T19:54:19+5:302025-03-22T19:55:17+5:30
गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटनांमुळे चर्चेत असलेल्या शिवशाही बसची आणखी एक घटना समोर आली आहे. धावत्या शिवशाही बसला आग लागली, यात बस पूर्णपणे जळाली.

प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या 'शिवशाही'ला आग, बस जळून खाक; अमरावतीमधील घटना
ShivShahi Bus: अमरावती जिल्ह्यात बडनेरा-यवतमाळ मार्गावर एका धावत्या शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली. शनिवारी (२२ मार्च) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अचानक बसच्या केबिनमधून धूर निघायला लागला. त्यामुळे बस चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर आगीचा भडका उडाला आणि अग्निशामक दल येईपर्यंत बस जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमरावती आगाराची शिवशाही बस बडनेरा ते यवतमाळ मार्गावरून निघाली होती. माहुली चोर गावानजीक बस आली. अचानक बसच्या केबिनमधून धूर येण्यास सुरूवात झाली. त्यामुळे बस चालकाने गाडी बाजूला लावली.
प्रवासी उतरले आणि उडाला भडका
मिळालेल्या माहितीनुसार, बसचालकाने गाडी बाजूला लावताच वाहकाने बसमधील प्रवाशांना तातडीने उतरायला सांगितले. त्यामुळे प्रवाशी खाली उतरले. त्यानंतर काही क्षणात आगीचा भडका उडाला. आगीच्या लोळांनी बसला कवेत घेतले.
वर्दळीच्या रस्त्यावर बसला आग लागल्याने वाहनेही थांबली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली आणि अग्निशामक दलाच्या बोलवले. पण, अग्निशामक दलाची गाडी येऊन आग विझवेपर्यंत बस जळून खाक झाली.